कोरोनाची दुसरी लाट; सोन्या चांदीच्या दरावर झाला असा परिणाम

मुंबई :

कोरोनाची दुसरी लाट युरोपीय देशांमध्ये आली असून आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच अमेरिकेच्या निवडणुकाही लागलेल्या आहेत. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या देशाचे आर्थिक पॅकेजबाबत अद्यापही अनिश्तितता आहे. जगभरातील भांडवल बाजारात आणखी काही काळ मोठ्या प्रमाणावर चढउतार दिसून येणार असल्याचे म्हटले जात आहे.

आज सकाळी बाजार उघडताच सोने ५० रुपयांनी वधारले. तर चांदीमध्ये ७५० रुपयांची वाढ झाली. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०६७५ रुपये आहे. चांदीचा भाव एक किलोला ६१४४३ रुपये असून त्यात ५७८ रुपयांची वाढ झाली आहे.

सध्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे कल वाढला आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोने सुरक्षित असल्याची भावना गुंतवणूकदारांमध्ये आहे. परिणामी सोन्या-चांदीच्या दरात गेल्या २ सत्रात तेजी दिसून आली.

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर सातत्याने खाली कोसळत होते. ५७ हजाराला टेकलेले सोने आता थेट ५० हजारांवर आले होते. आता चालू महिन्यात भाव कमी-जास्त होत आहेत. अमेरिकेची निवडणूक जवळ आलेली आहे. या पार्श्वभूमीवर तिथे अनेक घडामोडी घडत आहेत. त्याचा व्यावसायिक क्षेत्रावर परिणाम होत आहे. परिणामी परदेश बाजाराचा परिणाम देशांतर्गत बाजारावर नेहमी दिसून येत आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here