शिवसेनेची जहरी टीका; सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत

मुंबई :                  

काल सीमेवर असलेल्या बेळगाव आणि परिसरातील बांधवांसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकचा कोर्टात लढा सुरु आहे. याच निमित्ताने काल काळा दिवस पाळण्यात आला. दरम्यान तेथील ‘सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील’, असे विधान कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केले. याच पार्श्वभूमीवर आज सामनात भाष्य करण्यात आले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

सीमा भागातील जनतेला पाठिंबा म्हणून 1 नोव्हेंबरला महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी ‘काळा दिवस’ पाळला व दंडास काळ्या फिती बांधून काम केले. या आंदोलनात महाराष्ट्रातील भाजपसह इतर राजकीय पक्षही सामील झाले असते तर मराठी ऐक्याचे जोरदार दर्शन कानडी राज्यकर्त्यांना घडले असते. निदान दोन विरोधी पक्षनेत्यांनी तरी दंडास काळ्या फिती बांधून मराठी जनांच्या भावनेचा मान राखायला हवा होता. कर्नाटकात भाजपचे राज्य आहे व त्या राज्यात मराठी बांधवांवर अत्याचार सुरू असतील तर महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांचे मन अश्रूंनी भिजलेच पाहिजे. तसे का झाले नाही हे त्यांनाच माहीत. नाही म्हणायला चंद्रकांतदादा पाटलांनी बेळगावसह मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात यायलाच हवीत, असे म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्याबद्दल पाटलांचे आभार!

महाराष्ट्राची बांधिलकी बेळगावसह संपूर्ण सीमा बांधवांशी आहे. सीमाप्रश्नी 69 हुतात्मे देणारा शिवसेना हाच एकमेव पक्ष आहे. सीमा प्रश्नासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रदीर्घ तुरुंगवास भोगला आहे. सीमा भागात जेव्हा जेव्हा मराठी बांधवांवर कानडी सरकारचे हल्ले झाले, त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. ”सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील,” अशी अरेरावीचे भाषा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आज करीत आहेत. त्यांनी एक लक्षात घ्यावे, सूर्य-चंद्र महाराष्ट्रासही तेजाने प्रकाशमान करीत असतात. आचार्य अत्रे यांच्याच भाषेत सांगायचे तर ”सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत.” याद राखा! सूर्य-चंद्राच्याच साक्षीने कर्नाटकातून तुमची अरेरावी नष्ट होईल व मराठी बांधवांचा लढा यशस्वी होईल!

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here