‘त्यावरून’ शिवसेनेचा आक्रमक पवित्रा; भगवे झेंडे पायदळी, छत्रपती शिवरायांचे पुतळे रातोरात उखडले…

मुंबई :                  

काल सीमेवर असलेल्या बेळगाव आणि परिसरातील बांधवांसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकचा कोर्टात लढा सुरु आहे. याच निमित्ताने काल काळा दिवस पाळण्यात आला. दरम्यान तेथील ‘सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील’, असे विधान कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केले. याच पार्श्वभूमीवर आज सामनात भाष्य करण्यात आले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

20 लाख मराठी भाषिकांचा आक्रोश, किंकाळ्या, सांडलेले रक्त आणि बलिदानाची पर्वा न करता निव्वळ दडपशाही मार्गाने मराठी भावना चिरडून त्यांना कानडी मुलखात कोंबले हा अन्याय नाही का? हा अन्याय सूर्य- चंद्राच्या साक्षीनेच झाला. लोकशाहीत 20 लाख लोकांच्या भावनेस किंमत नसेल तर तुमच्या त्या लोकशाहीची गरज ती काय? एखाद्या राज्याचा स्थापना दिवस हा पवित्र, मंगलमय दिवस असतो. त्या दिवसाला गालबोट लागू नये हे आमचेही मत आहेच, पण गेल्या साठेक वर्षांत मराठी माणूस, भाषा, संस्कृतीवर जे निर्घृण हल्ले तेथे सुरू आहेत त्याचाच हा उद्रेक असतो. कर्नाटक व महाराष्ट्राचे व्यक्तिगत भांडण असण्याचे कारण नाही. एक बेळगावचा वाद सोडला तर दोन राज्यांतील सामाजिक, सांस्कृतिक, व्यापारी नाते इतर राज्यांपेक्षा घट्ट आहे; पण कर्नाटक त्याच्या हद्दीतील 20 लाख मराठी बांधवांशी ज्या निर्घृणपणे वागत आहे तो प्रकार संतापजनक आहे.

तेथील मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी नाटय़गृहे, मराठी ग्रंथालये याबाबत अत्यंत अमानुष वर्तन स्वतंत्र हिंदुस्थानात केले जात आहे. 1 नोव्हेंबर हा ‘काळा दिवस’ पाळण्याचे तेदेखील एक कारण आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत तेथील मराठी बांधवांशी किमान माणुसकीने वागायला काय जाते? महाराष्ट्रातही लाखो कानडी बांधव आपले उद्योग-व्यवसाय करीत सुखाने राहत आहेत हे लक्ष्मण सवदीसारख्या मंत्र्याने विसरू नये. बेळगावातील भगवे झेंडे उतरवून ते पायदळी तुडवले जातात, छत्रपती शिवरायांचे पुतळे रातोरात उखडले जातात, मराठी भाषेतले फलक तोडले जातात हा मोगलाईचाच प्रकार आहे. महाराष्ट्रातील राज्यपालांनी या अत्याचारांविरोधात कर्नाटकातील राज्यपालांशी कडक शब्दांत बोलायला हवे. किमानपक्षी राज्यपालांनी बेळगावच्या शिष्टमंडळास पंतप्रधान मोदींची वेळ मिळवून द्यायला मदत केली पाहिजे. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here