शिवसेनेचा हल्लाबोल; आक्रोश, किंकाळ्या, सांडलेले रक्त आणि बलिदानाची पर्वा न करता….

मुंबई :

काल सीमेवर असलेल्या बेळगाव आणि परिसरातील बांधवांसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकचा कोर्टात लढा सुरु आहे. याच निमित्ताने काल काळा दिवस पाळण्यात आला. दरम्यान तेथील ‘सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील’, असे विधान कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केले. याच पार्श्वभूमीवर आज सामनात भाष्य करण्यात आले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

महाराष्ट्रातील नेते कितीही ओरडत असले तरी जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत तोपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहणार असल्याची आरोळी तेथील उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी ठोकली आहे. अशा आरोळय़ांची पर्वा न करता गेल्या 70 वर्षांपासून सीमा भागातील मराठी बांधवांचा लढा सुरूआहे. हा जो कोणी लक्ष्मण सवदी गोधडीत रांगत होता त्याआधीपासून 20 लाख मराठी बांधव महाराष्ट्रात येण्यासाठी संघर्ष करीत आहेत. सध्या बेळगावचा तिढा सर्वोच्च न्यायालयात लटकला आहे. त्यामुळे आता न्यायालयच काय ते ठरवेल. सूर्य-चंद्र आकाशात आहेत की नाहीत हे पाहून सर्वोच्च न्यायालय बेळगावप्रश्नी निकाल देणार नाही आणि सूर्य-चंद्र हे काही कुणाच्या बापाचे नोकर नाहीत. सूर्याच्या ढळढळीत प्रकाशझोतात बेळगावचा लढा सुरू आहे.

त्याच सूर्यप्रकाशात कानडी पोलीस ‘जय महाराष्ट्र’ म्हणणाऱया मराठी बांधवांवर अत्याचार करीत आहेत व रात्रीच्या अंधारात, चंद्राच्या शीतल प्रकाशात छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवीत असतात. पण तेथील मराठी बांधवांचे मनोधैर्य खचले नाही हाच शिवरायांचा आशीर्वाद आहे. कर्नाटक सरकारचा 1नोव्हेंबर हा स्थापना दिवस असतो. हा दिवस सीमा भागातील मराठी लोक ‘काळा दिवस’ म्हणून पाळतात. ही वेळ 20 लाख मराठी बांधवांवर कोणी आणली? भाषावार प्रांतरचना केल्यावर मराठी भाषिकांना त्यांच्या हक्काच्या राज्यात जाण्याचा अधिकार का नाकारला गेला? 20 लाख मराठी भाषिकांचा आक्रोश, किंकाळ्या, सांडलेले रक्त आणि बलिदानाची पर्वा न करता निव्वळ दडपशाही मार्गाने मराठी भावना चिरडून त्यांना कानडी मुलखात कोंबले हा अन्याय नाही का? हा अन्याय सूर्य- चंद्राच्या साक्षीनेच झाला. लोकशाहीत 20 लाख लोकांच्या भावनेस किंमत नसेल तर तुमच्या त्या लोकशाहीची गरज ती काय? 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here