भावनिक झालेल्या राज ठाकरेंनी आपल्या आवडत्या नटास वाहिली श्रद्धांजली; म्हणाले…

मुंबई :

‘जेम्स बॉन्ड’ या प्रचंड प्रसिद्ध पात्राला अजरामर करणारे आणि 1962 ते 1983 एवढ्या प्रदीर्घ काळासाठी ‘जेम्स बॉन्ड’ची भूमिका साकारणारे अभिनेते सर शॉन कॉनरी याचं काल वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. याच पार्श्वभूमीवर आपल्या आवडीच्या अभिनेत्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली.

राज ठाकरेंनी पोस्ट :-

गॉडफादर म्हणलं की मार्लन ब्रँडो ह्यांचाच चेहरा जसा डोळ्यासमोर येतो तसं जेम्स बॉण्ड म्हणलं की बॉन्डपटांच्या चाहत्यांना शॉन कॉनरीच आठवतात.

शीतयुद्धाच्या काळात इयान फ्लेमिंग ह्यांच्या पुस्तकातील ‘जेम्स बॉण्ड’ हा लोकप्रिय होणं हे स्वाभाविक होतं पण त्या नायकाचं पुस्तकातलं अस्तित्व प्रतिमेच्या विश्वात शॉन कॉनरी ह्यांनी अधिक उत्कट केलं, ठळक केलं.

शॉन कॉनरी ह्यांनी ६ बॉन्डपट केले पण त्या बॉण्डपटातील जेम्स बॉण्ड त्यांनी इतका घट्ट रुजवला की त्यामुळे पुढे जेम्स बॉण्ड साकारणाऱ्या प्रत्येक नटाची दमछाक झाली.

कधीही सूर्य न मावळण्याची वलग्ना करणाऱ्या ब्रिटिश साम्रज्याचा सूर्य दुसऱ्या महायुद्धानंतर मावळतीला लागला आणि अशा वेळेस जागतिक राजकारणात ब्रिटनचं महत्व उत्तरोत्तर कमी होत असताना किमान प्रतिमा पातळीवर ब्रिटन ही महासत्ता आहे हा भास कायम ठेवण्यात ‘इयान फ्लेमिंग’ ह्यांच्या प्रतिभेतून उतरलेला आणि ‘शॉन कॉनरी’ ह्यांच्या प्रतिमेतून उभा राहिलेला ‘जेम्स बॉण्ड’ कारणीभूत आहे. प्रतिभा आणि प्रतिमेच्या संगमाच्या जोरावर एखादया देशाची सॉफ्ट पॉवर निर्माण होणं आणि ती अनेक दशकं टिकणं हे जगातील दुर्मिळ उदाहरण असावं.

शॉन कॉनरीना पडद्यावर पाहताना प्रेक्षकाला स्वतःच्यातल्या मर्यादा, उणिवा जाणवत राहतात पण तरीही मी पण मर्त्य माणूस आहे, सगळे लोभ, मोह हे मला पण सुटले नाहीत हे दाखवत त्यांनी ‘जेम्स बॉन्ड’ला वास्तवाच्या जगात घट्ट रोवून उभं केलं, हे शॉन कॉनरी ह्यांचं यश. आणि म्हणूनच आजही माझे सगळ्यात आवडते बॉण्ड नट हे शॉन कॉनरीच आहेत. शॉन कॉनरी ह्यांच्या स्मृतीस माझी विनम्र श्रद्धांजली.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here