‘तुमचे मुलांकडे लक्ष आहे का, नसेल तर..’; वाचा पॅरेंटिंगबाबतचा महत्वाचा लेख

नुकतीच एक बातमी वाचली. होय, माहिती नाही बातमीच. कारण, माहिती आणि ज्ञान वाचायला आपल्याला कुठे फुरसत आहे. व्हाटस्अॅपच्या विद्यापीठातील ‘गिन्यान’ वाचून आपण सगळे तृप्त झाल्यावर मग अशी माहिती वाचून काय होणार आहे. कारण, माहिती ही बोगस असते आणि ‘गिन्यान’ खरेखुरे वास्तव. त्याच आभासी गिन्यान घेण्याच्या नादात असताना एका भावाने बहिणीला हातोड्याने मारून टाकल्याची बातमी वाचली. कारण काय तर फ़क़्त टीव्हीचा रिमोट दिला नाही म्हणून..!

होय, कुठे अमेरिका, युरोप किंवा पाकिस्तानात ही घटना नाही घडलेली. महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर या शहरातील ही घटना आहे. वाचून मन सुन्न झालं. व्हाटस्अॅपच्या गीन्यानामुळे ‘सब चंगा सा’ असा मनात असलेला आवाज रागात अपोआप परावर्तीत झाला. कारण, एकदम शुल्लक घटनेवरून आपली मुले-मुली जर या थराला जाणार असतील तर आपण पॅरेंटिंग करतोय की फ़क़्त गिन्यान घेऊन जगाला अक्कल पाजळतोय असे वाटणारच की..

नगरमधील पत्रकार अरुण नवथर यांनी याबाबतीत एक फेसबुक पोस्ट लिहिलीय. क्राईम रिपोर्टर आहेत ते. आणि सध्या मुळचे केडगाव भागात राहणारे. त्यांनीच केडगाव उपनगरातील ही दुर्दैवी घटना लिहिलीय. त्याला हेडिंग दिलेले आहे की, टीव्हीच्या रिमोटसाठी 9 वीत शिकणाऱ्या मोठ्या भावाने डोक्यात हातोडीने वार करत संपवले बहिणीचे आयुष्य..!

असे वाचून पुढे वायाचाला घेतले. मला काय म्हणायचेय त्यापेक्षाही स्पष्ट आणि मुद्देसूदपणे त्यांनी त्यावर आपले मत मांडलेय. त्यांनी म्हटलंय की, शहरातील एका प्रतिष्टित इंग्लिश मीडियम शाळेच्या नववीच्या वर्गात शिकणाऱ्या मोठ्या भावाने हातोडीने वार करत आपल्याच लहान बहिणीचे आयुष्य झटक्यात संपवले आहे. घटस्थापनेच्या सायंकाळीच ही दुर्दैवी घटना घडली. नगरच्या केडगाव उपनगरातील सचिननगर भागात असा हृदयद्रावक प्रकार घडल्याने मन सुन्न झाले. आई-वडील दोघेही घराबाहेर असताना आणि घरात इतर कोणीही नसताना टीव्हीच्या रिमोटवरून दोघा बहिण-भावंडात वाद झाला. त्यावेळी राग अनावर झालेल्या मोठ्या भावाने बहिणीच्या डोक्यात हातोडीने किमान 10 ते 12 वार केले. होय, वराच केले. तेही जीवघेणे..

पुढे त्यांनी लिहिलेले तर अंगावर काटा आणणारे आहे. ते लिहितात, त्यानंतर जसे काही झालेच नाही असे दाखवत हा भाऊ सायकलमध्ये हवा भरून पाळला. हा अल्पवयीन भाऊ घरातून पसार झाल्यावर दरम्यान, पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतले. मात्र, पकडल्यावरही त्याच्या चेहऱ्यावर साधा पश्चातापाही दिसून आला नाही… केवळ टीव्हीचा रिमोट हवा होता म्हणून स्वतःच्याच चिमुकल्या बहिणीचा त्याने असा अंत केला… आई-वडील आणि भाऊ-बहीण असलेल्या अशा या चौकोनी, श्रीमंती आणि सधन कुटुंबात ही घटना घडली..!

आई आणि वडील यांचा मुलांमधील कमी होत चाललेला संवाद, मोबाईल आणि टीव्हीचा अतिवापर याचाच हा बळी असल्याचे पत्रकार नवथर यांना वाटते. त्यांना काय वाटते याला तशीही आपल्याकडे काहीच किंमत आपण देत नाहीत. विचारांना आपणच किंमत देत नसल्यावर आणि व्यावहारिक जगात मुजोरीपुढे आणि अविचारी मंडळींपुढे पालक लाचार असल्याचे पाहिल्यावर मुले-मुली काय आदर्श घेणार आपला? आपण त्यांना विचार कमी आणि आणि अविचार जास्त शिकवत असतो. भले थेट आपण त्यांना अविचाराचे दालन उघडे केले नसेल. मात्र, सुसंवाद म्हणजे काय आणि मुलांना प्रेम देण्याची पद्धत म्हणजे काय हेही आपणच विसरलोय की..

पत्रकार नवथर यांनी अखेरीस लिहिले आहे की, प्लिज आपण सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे..! माहित नाही त्यांचे वाचून किंवा इथेही माझे लेखन वाचून आपण हा विचार करणार की नाही. वाचक मित्र-मैत्रिणींनो, आपण धर्म, जात आणि बेगडी श्रीमंती यांच्यात अडकून पडून एकांगी झालेलो असल्यास आपली पुढची पिढीही तशीच होणार नाही तर काय महात्मा होईल का? मुळे पालकांचे अनुकरण करतात. मोठ्यांचेही करतात. आपणच बिघडलेलो असल्यावर आपले पाल्य घडतील याची काय अपेक्षा करताय..?

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here