लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर; वाचा एका मराठी उद्योजकाचा संघर्षमय प्रवास

इ.स. १८८८ साली लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांनी बेळगावात सायकलदुरुस्तीचे दुकान थाटत व्यावसायिक क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले. बेळगावात प्लेगची साथ आल्याने दुकान शहरा बाहेर हलवावे लागले. मात्र परदेशी नागरिक भीतीने न आल्याने हा धंदाही बसला. नुसते सायकलवर अवलंबून राहण्यासारखे नव्हते म्हणून त्यांनी आजूबाजूच्या परिसरावर लक्ष केंद्रित केले. त्यातून त्यांना शेतक-याची अडचण लक्षात आली. शेतकरी जनावरांना कोंडा घालत. त्यात धान्याची पाती व फांद्याचे तुकडे असत. जनावरे ते खात नसत. ते तुकडे तसेच बाहेर टाकत त्यामुळे जनावरांनाही त्रास होत असे. त्यामुळे लक्ष्मणरावांनी चा-याचे बारीक तुकडे करणारे यंत्र बनवले. त्यांनी ते मशीन खेड्यापाड्यात जाऊन चालवून दाखवले. लोकांना ते पसंत पडले. जनावरांचाही त्रास कमी झाला. मात्र गुरांसाठी पैसे खर्च करण्याची मानसिकता शेतक-यात नव्हती. कारण रानात चा-याचा तुटवडा नव्हता.
हा प्रयोग फेल झाल्यावर त्यांनी विचार केला की, शेतक-यांना आवश्यक असणारी वस्तू बनविली पाहिजे. त्याप्रमाणे त्यांचे लक्ष नांगरकडे वळले. पारंपरिक नांगर खोलवर शेत नांगरत नव्हते. त्यामुळे पिक चांगले जोम धरत नसायचे म्हणून त्यांनी अधिक लोखंड घालून मजबूत नांगर बनविला. मात्र नवा नांगर आपल्या जमिनीत घालावा ही मानसिकता शेतक-यांची नव्हती. मात्र लक्ष्मणरावांना नांगर चालेल असा विश्वास होता. अनेकांनी तो नांगर नाकारला. शेतकी खात्याने त्यांच्या नावाची शिफारस न करता त्यात चुका काढल्या. लक्ष्मणरावांनी ते आव्हान स्वीकारले त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. परदेशी नांगराचा अभ्यास करून आपल्या नांगरात सुधारणा केल्या. मात्र तरीही त्याची किंमत त्याकाळी ४० रु. होती. सामान्य नांगर ६ रु. ला पडत होता. ही मोठी अडचण होती. मात्र येणारे पिक जमा धरल्यास हा खर्च सहज परवडणारा होता. म्हणून किर्लोस्करांना विश्वास वाटत होता. त्यांच्या नांगराची माहिती मिळाल्यावर काही शेतकरी आले व त्यांनी मोठी ऑर्डर दिली. त्यातून त्यांना उत्साह वाढला. नांगर हळूहळू प्रसिद्ध होऊ लागले. यानंतर मात्र सरकारच्या शिफारसीत किर्लोस्कर नांगराचा समावेश झाला. अनेक व्यापा-यांनी ते खरेदी केले व इतर शेतक-यांना ते भाड्याने वापरण्यास दिले. अशाप्रकारे व्यवसाय वाढत गेला.
कारखाण्याच्या जमिनीचा प्रश्न निर्माण झाल्याने ती जागा जाणार होती. दरम्यान त्यांनी एका मित्राला औंध येथे सभागृह बांधकामात चांगले काम करून दिल्याबद्दल त्या मित्राने किर्लोस्कर यांना पडीक जमीन कारखान्यासाठी दिली. त्या जमिनीत साप विंचू फार होते. रेल्वे दूर अंतरावर होती. रस्तेही चांगले नव्हते. अन्य सुविधा नव्हत्या, मात्र ओंध येथील त्या पडीक जमिनीत त्यांनी कारखाना उभारण्याचे आव्हान स्वीकारले.
बेळगावहून रेल्वेने यंत्रसामग्री आणली. तेथून बैल गाडीतून ते सामान आणले व कारखाना सुरु केला. हा कारखाना एवढा वाढला की, ही जमीन म्हणजेच प्रसिद्ध उद्योग वसाहत किर्लोस्कर वाडी बनली. एक प्रसिद्ध उद्योग नगरी. शून्यातून आकाराला आलेल्या उद्योगाची कर्मभूमी.
येथे ३ वर्षे चांगला व्यवसाय केल्यावर १९१४ मध्ये युद्ध सुरु झाले. त्यामुळे परदेशी रंग, लोखंड मिळणे कठीण झाले. मात्र किर्लोस्कर यांनी तोडगा काढला. त्याकाळी कोल्हापुरात बिनकामाच्या तोफा पडून होत्या, त्या त्यांनी मिळविल्या आणि त्या वितळवून कच्चे लोखंड मिळवून नांगर तयार केले. त्याच दरम्यान जवळच भद्रावती येथे कच्च्या लोखंडाचा कारखाना सुरु झाला होता. त्यामुळे लोखंडाची गरज मिटली. कोळसा लाकडाच्य वखारीतून त्यांनी मिळविला. रंगाचा कारखाना स्वत:च सुरु केला.
या युद्धकाळात अनेक वस्तूंची मागणी वाढते व व्यापारी उद्योगपती तरले जातात. त्याप्रमाणे किर्लोस्कर उद्योगही तरला. १९१८ पर्यंत त्याचे भांडवल ५ लाख झाले होते. त्याकाळी ही रक्कम गडगंज होती. यानंतर मात्र किर्लोस्कर यांनी उद्योगात भरारी घेण्यास सुरुवात केली. १२ लाखाचे भांडवल उभे करून किर्लोस्कर ब्रदर्स लि. कंपनी स्थापन केली. तिची व्यवस्था पाहण्यासाठी किर्लोस्कर सन्स एन्ड कंपनी उभारण्यात आली. लोकाचा विश्वास् बसावा यासाठी कंपनी गुंतवणुक दारांना ९% डिव्हिडंड देणार नाही तोपर्यंत संचालक मोबदला घेणार नाहीत असे जाहीर केले. याचा चांगला परिणाम झाला. मोठे भांडवल उभे राहिले.
१९२० च्या सुमारास आणखी दोन यंत्रे बाजारात आणली. उसाचा रस काढण्याचे मशीन आणि ड्रिलिंग मशीन. त्याचबरोबर इतरही शेतकी कामात उपयोगी पडणारी साधने तयार करण्यात येत होती.
किर्लोस्कर समूहाची धुरा त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र शंतनुराव किर्लोस्कर यांनी सांभाळली.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here