संजय राऊतांचा खडा सवाल; तर त्या जमिनीच्या तुकडय़ांचा उपयोग काय?

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोक या सदरातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी 370 कलम आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या घडामोडींवरून केंद्रावर निशाणा साधला.

वाचा नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या रोखठोकमध्ये :-  

कश्मीरचा प्रश्न फक्त पंडित नेहरू किंवा काँग्रेसमुळेच चिघळला हा काही प्रमाणात अपप्रचार आहे. पंडित नेहरूंनी कश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी व शांतता राखण्यासाठी त्यांच्या परीने प्रयोग केले. असे ‘प्रयोग’ अटलबिहारी वाजपेयी यांनीही केले. लाहोरला ते बस घेऊन गेले. मुशर्रफबरोबर आग्रा येथे परिषद घेतली. हा प्रयोगच होता. मोदी-शहा यांनी मेहबुबा मुफ्तींबरोबर भाजपचे सरकार जम्मू-कश्मीरमध्ये बनवले. ते कशासाठी? याकडेही एक शांतता राखण्याचा ‘प्रयोग’ म्हणूनच पाहायला हवे. मेहबुबा मुफ्ती व त्यांचा पक्ष सरळ आझाद कश्मीरच्या बाजूने आहे. जोपर्यंत पुन्हा 370 कलम कश्मीरात लावले जात नाही तोपर्यंत कश्मीरात तिरंगा फडकवू दिला जाणार नाही, अशी बेताल भाषा करणाऱया मेहबुबा मुफ्तीला अटक करून दिल्लीतील तिहार किंवा महाराष्ट्रातील येरवडा तुरुंगात ठेवायला हवे. किंबहुना त्यांची रवानगी अंदमानच्या कारागृहात करायला हवी एवढा त्यांचा अपराध भयंकर आहे. डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी तर हिंदुस्थानच्या विरोधात चीनची मदत घ्यायची भाषा केली. हा अतिरेक आहे.

डॉ. मुखर्जींचे बलिदान

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा कश्मीरच्या भूमीवर मृत्यू झाला. हे बलिदान ठरले. त्याचा संदर्भ आजही दिला जातो. 18 सप्टेंबर 1953 रोजी संसदेत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या मृत्यूबद्दल चर्चा झाली. त्यात हिंदू महासभेचे परखड नेते डॉ. ना. भ. खरे यांनी म्हटले, ”डॉ. मुखर्जींचा मृत्यू म्हणजे सरकारच्या एका विरोधकाचा राजकीय आणि वैद्यकीय वध आहे. वैद्यकीय भागाकरता श्रीनगर जबाबदार आहे आणि राजकीय भागाकरता नवी दिल्ली जबाबदार आहे. जे जे आपल्या विरोधी असतील त्यांना कोणत्याही मार्गाने नेस्तनाबूत करायचे हे या सरकारचे धोरणच आहे. 11 मे 1953 रोजी डॉ. मुखर्जींच्या श्रीनगरमधील अटकेची बातमी वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली. त्यानंतर 13 मे रोजी मी डॉ. मुखर्जी बहुतकरून तुरुंगातून बाहेर येणार नाहीत असे भय व्यक्त केले होते. तो माझा राजकीय अंदाज होता. कारण सरकार आपल्या विरोधकांबद्दल अशीच शत्रुत्वाची वृत्ती ठेवते हे मला गांधीहत्येनंतर अनुभवायला आले होते. डॉ. मुखर्जी शत्रूच्याच हाती सापडले होते म्हणून मी असे राजकीय भाकीत केले होते.” डॉ. खरे यांच्या विधानाने तेव्हा खळबळ माजली होती. डॉ. मुखर्जी यांच्या मृत्यूचे रहस्य आजही कायम आहे. डॉ. मुखर्जी यांच्यानंतर शेकडो सैनिक, नागरिकांनी कश्मीरसाठी बलिदान दिले. पण डॉ. मुखर्जी हे त्या लढय़ातले अग्रणीच होते.

संसदेत खडाजंगी

कश्मीरप्रश्नी पंडित नेहरूंच्या काळातही संसदेत व बाहेर खडाजंगी होत असे. कश्मीरप्रश्नी पंडित नेहरू पिंवा तेव्हाच्या राज्यकर्त्यांच्या भूमिका लेच्यापेच्या होत्या हा आरोप, अपप्रचार तितकासा खरा नाही. इतिहास सोयीनुसार मांडण्याची परंपरा आता सुरू झाली आहे. ऑगस्ट-सप्टेंबर 1953 मध्ये संसदेचे अधिवेशन चालू होते. त्या वेळी 5 ऑगस्टच्या सुमारास डॉ. खरे यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले. कश्मीरचे पंतप्रधान शेख अब्दुल्ला यांना पंतप्रधानपदावरून बडतर्फ करावे व तुरुंगात टाकावे असे सुचविले होते व ‘आमचे हॅम्लेट’ (पं. नेहरू) यांना हे धैर्य होईल का? असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर 7 ऑगस्ट रोजी श्रीनगर येथे एका जाहीर सभेत शेख अब्दुल्ला बरळले की, ”भारतामधील एका दुष्ट राजकारणी व्यक्तीने मला पकडण्याची सूचना केली आहे. पाहू, मला कोण पकडते ते. तो भारताचा प्रश्न नाही. कश्मीर स्वतंत्र आहे.” शेख अब्दुल्ला हे बरळले. त्यांनी भारत सरकारलाच आव्हान दिले. तेव्हा पंडित नेहरू शांत बसले नाहीत. त्याच दिवशी शेख अब्दुल्ला यांना अटक केली हे महत्त्वाचे.

पंडित कधी येतील?

कश्मीर खोऱयातून 40,000 कश्मिरी पंडितांनी पलायन केले. त्यांची ‘घरवापसी’ करू व 370 कलम हटवल्यावर पंडितांना त्यांच्या घरी सहज जाता येईल असा ‘प्रपोगंडा’ केला गेला. तो चुकीचा आहे. एकही कश्मिरी पंडित अद्याप कश्मीर खोऱयात परतू शकला नाही. ‘जहाँ हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है.’ ही घोषणा प्रेरणादायी आहे. पाकिस्तानप्रेमींना कश्मीरातून उखडून फेकले पाहिजे. पण पाकिस्तानचा विषय हा देशातील निवडणुकांत तोंडी लावण्याचा विषय आहे. कश्मीर हा फक्त आपल्यासाठी एक जमिनीचा तुकडा नाही, त्याहीपेक्षा बरेच काही आहे. कश्मीर ही हिंदुत्वाची, धर्माची भूमी आहे. देव-देवतांची भूमी आहे. आता तिकडे जमिनी वगैरे खरेदी करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. पण चार दिवसांपूर्वीच श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यास गेलेल्या तरुणांना पोलिसांनी रोखले. तिरंगा फडकवण्यास मज्जाव केला. पुणाच्या भावना दुखावतील म्हणून हा विरोध केला? तिरंगा फडकवल्याने वातावरण बिघडेल म्हणून विरोध केला का? जमिनी खरेदी करायच्या, पण त्या जमिनीवर आमचा तिरंगा फडकवता येत नसेल तर त्या जमिनीच्या तुकडय़ांचा उपयोग काय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here