संजय राऊतांचा सामनातून हल्लाबोल; तर पाकिस्तानप्रेमाचे तुणतुणे वाजवून ‘ब्लॅकमेल’ करायचे

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोक या सदरातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी 370 कलम आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या घडामोडींवरून निशाणा साधला.

वाचा नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या रोखठोकमध्ये :-  

370 कलमाचा निचरा करूनही कश्मीरचा प्रश्न संपला नाही. कश्मीरात आता बाहेरच्यांनाही जमीन खरेदी करता येईल असे सरकारी आदेश आले; पण श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यावर आजही बंदी आहे. मग ते जमिनीचे तुकडे घेऊन काय करायचे?

कश्मीरची समस्या कायमचीच संपायला हवी. अयोध्येतील राममंदिराचा प्रश्न मार्गी लागला. तसा कश्मीरचा प्रश्नही संपावा. कश्मीरच्या भूमीवर जितका रक्तपात झाला तेवढा आतापर्यंत हिंदुस्थानने लढलेल्या चार युद्धांतही झाला नसेल. मोदी हे दुसऱ्या वेळेस पंतप्रधान झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात अमित शहा गृहमंत्री म्हणून बसले. त्यांनी एक काम केले. ते म्हणजे कश्मीरातील 370 कलम उडवून लावले.

’35 अ’ कलम संपवले. लडाखला जम्मू-कश्मीरपासून तोडून स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश केला. या घटनेस एक वर्ष झाल्यावर आता जम्मू-कश्मीरमध्ये बाहेरच्या लोकांना जमीन खरेदीस केंद्राने परवानगी दिली आहे. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कश्मीरमध्ये 370 कलम असल्यामुळे ते एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगत होते. पुन्हा तेथील राजकीय पक्षांचा दोन दगडांवर पाय. त्यातला एक पाय पाकिस्तानात. हिंदुस्थानच्या केंद्रीय सरकारने मनासारखे केले नाही तर पाकिस्तानप्रेमाचे तुणतुणे वाजवून ‘ब्लॅकमेल’ करायचे हे आतापर्यंत चालले. ते काही प्रमाणात कमी झाले आहे. मात्र 370 कलम हटवल्यावर कश्मीरातील परिस्थिती सुरळीत होईल असे काही झाले नाही. उलट तेथील लोकांवर, राजकीय हालचालींवर कडक निर्बंध लादले. आजही कश्मीरात लष्कराच्या बंदुकांमुळेच शांतता आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here