अकरावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; ‘या’ दिवशी सुरु होणार ऑनलाईन वर्ग

पुणे :

मराठा आरक्षणाला कोर्टाने दिलेल्या स्थगितीमुळे अनेक परीक्षा आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश लांबणीवर पडलेले आहेत. सध्या प्रवेश प्रक्रिया, परीक्षा या आणि अशा आरक्षणाच्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक विषयांबाबत लोकांच्या, विद्यार्थ्यांच्या मनात साशंकता आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे अकरावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून येत्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून अकरावीचे ऑनलाईन वर्ग सुरु केले जाणार आहेत.

शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाला दिलासा मिळावा आणि विद्यार्थ्यांना हव्या त्या शाखेचा अभ्यास सुरु करता यावा याकरिता प्रवेशाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत अकरावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमांद्वारे शिक्षण देण्यात येईल. या माध्यमातून विशेषतः विज्ञान, वाणिज्य, कला या शाखांमधील सर्वाधिक घेण्यात येणारे विषय किंवा बंधनकारक असलेल्या विषयांच्या तासिका ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच या ऑनलाईन तासिका कोणत्या व्यासपीठावर , कशा आणि किती वेळासाठी उपलब्ध होतील यासंदर्भातील अधिक माहिती लवकरच देण्यात येईल, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद( एससीईआरटी)चे संचालक दिनकर पाटील यांनी याविषयी बोलताना म्हटले आहे की, अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अभ्यासाचा येत्या आठवड्यात सुरु करण्याचा विचार सुरु आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here