विजय वडेट्टीवारांच्या ‘त्या’ भूमिकेला दिलं भाजपनं समर्थन; वाचा काय आहे प्रकरण

पुणे :

मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरू करा. ओबीसींसह इतर मुलांचं वय वाढत चाललंय, त्यांना वेठीस धरायला नको. OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?, असा सवाल मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वडेट्टीवार यांच्या भूमिकेचे समर्थन केले.

याविषयी बोलताना दरेकर म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबतीत राज्य सरकारने संवेदनशीलपणाने लक्ष घालण्याची गरज आहे. शैक्षणिक प्रवेश आणि नोकऱ्यांचा प्रश्न आहे. यासोबत ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांचाही प्रश्न आहे. ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर नोकरभरतीत अन्याय होता कामा नये.

ओबीसी समाजात देखील मोठया प्रमाणात आर्थिकरित्या कमजोर कुटुंब आहेत त्यांच्याही नोकऱ्यांचा प्रश्न आहे. यामुळे राज्य सरकारमधील एक मंत्री जर मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून नोकरभरती सुरू करा, अशी मागणी करत असेल तर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे, असेही पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान एसटीच्या खासगीकरणाचा डाव असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला आहे. ‘एसटी कर्मचाऱ्यांचा पगार व्हायला हवा पण त्यासाठी एसटी महामंडळाच्या जागा किंवा संपत्ती गहाण ठेवणे याचा आम्ही निषेध करतो त्याला आमचा विरोध आहे. सरकारने कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे पण त्यासाठी कर्ज काढता येईल. महामंडळाच्या जागा किंवा संपत्ती गहाण ठेवणे हा कुठे तरी खासगीकरणाचा डाव असल्याचं दिसतंय, अशी शंका दरेकर यांनी व्यक्त केली.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here