शेतकऱ्यांच्या ‘त्या’ फायद्यासाठी कृषी खात्याचा विमा कंपन्यांना इशारा; वाचा, काय म्हटलेय कृषी विभागाने

पुणे :

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने दिलेल्या तडाख्यामुळे मोठे नुकसान झाले. दरम्यान राज्यातील विमा कंपन्यांनी सर्वेक्षण लवकर करावे यासाठी ‘राज्यात विमा कंपन्यांनी पीक नुकसानीचे सर्वेक्षण वेळेत न केल्यास थेट महसूल किंवा कृषी विभागाची उपलब्ध माहिती ग्राह्य धरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल’, असा इशारा कृषी खात्याने विमा कंपन्यांना दिला आहे.

आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खरीप वाया गेलेल्या भागात शेतकऱ्यांना रब्बीपासून आशा आहेत. त्यांना मशागत करून रब्बी पिके घ्यायची आहेत. मात्र, कंपन्यांकडून खरिपातील नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण होत नाही. सर्वेक्षण न करता रब्बीचा पेरा केला आणि नंतर सर्वेक्षण झाले तर भरपाई मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी शेतकऱ्यांची हीच बाजू उचलून धरत कामचुकार कंपन्यांना निर्वाणीचा इशारा दिला. कंपन्यांनी सर्वेक्षण टाळल्यास शासकीय यंत्रणांकडील नुकसानीची माहिती ग्राह्य धरू, असा इशारा कृषी खात्याने दिला आहे.

शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही नुकसानभरपाई कधी येणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेलं आहे. कारण पुढचे पिक घेण्यासाठी आर्थिक मदत गरजेची आहे. मात्र, भरपाई टाळण्यासाठी विमा कंपन्या सर्वेक्षण करण्यास टाळाटाळ करीत आहेत. सर्वेक्षण होत नसल्याने रब्बीसाठी शेतीची मशागत करणे किंवा गहू, हरभरा या रब्बी पिकाचा पेरा देखील रखडला आहे.    

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here