राज ठाकरेंनंतर संजय राऊतही घेणार राज्यपालांची भेट; ‘हे’ आहे कारण

मुंबई :

काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतली. वीजबिल आणि दुधा दराविषयी त्यांनी राज्यपालांशी चर्चा केली. आता आज शिवसेना नेते व खासदार संजय राऊतही राज्यपालांची भेट घेणार आहेत. आज सामनाच्या अग्रलेखात बिहारमधील मुंगेर येथे घडलेल्या प्रकारणावरून राऊत यांनी भाजपला डिवचले होते. ‘मुंगेर हिंसाचारावर भाष्य करत कधी घंटा बडवणार? निदान थाळय़ा तरी वाजवा’, असा सल्ला घंटाबाज हिंदुत्ववाद्यांना देण्यात आला होता. याच मुंगेर हिंसाचारप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती करण्यासाठी राऊत राज्यपालांची भेट घेणार आहेत.   

याविषय बोलताना राऊत म्हणाले की, आतापर्यंत बिहार राज्यपालांनी आणि भाजपनेही यासंबंधी कोणतेही प्रश्न उपस्थित केले नाहीत. मी तर महाराष्ट्राच्या राज्यपालांना तेथील राज्यपालांशी चर्चा करा अशी विनंती करणार आहे. तेथील सरकारचे प्रमुख धर्मनिरपेक्ष झाले का असं विचारा? असं सांगणार आहे.

नेमकं काय आहे बिहारमधील मुंगेर प्रकरण :-

मुंगेरमध्ये गुरूवारी पुन्हा एकदा हिंसाचारानं टोक गाठलं दूर्गा मूर्ती विसर्जनावेळी पोलीस आणि स्थानिकांमध्ये वाद झाला. याच वादातून पोलिसांनी मध्यरात्री गोळीबार केला. यात एका १८ वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला तर १५ लोक गंभीर जखमी झाले होते.

या प्रकरणावरून सामनात केलेलं भाष्य :-

मुंगेरातील दुर्गा प्रतिमेचा अवमान व गोळीबार म्हणजे ‘जंगलराज’ आहे असे या ढोंगी डोमकावळ्यांना वाटू नये याचं आश्चर्य वाटतं. एकतर बिहारातील भाजपने डोळ्यांवर ‘सेक्युलर’ चष्मा चढवल्याने त्यांना मुंगेरची आक्रोश करणारी दुर्गामाता दिसत नाही. महाराष्ट्रात मंदिरे उघडा असे ‘घंटानाद’ करून सांगितले जात आहे. मंदिरांची टाळी तोडून आत जाऊ, अशा धमक्या दिल्या जात आहेत. या मंडळींना मुंगेरचा हिंसाचार, हिंदुत्वाचा अवमान याबाबत काहीच घेणं- देणं पडलेलं दिसत नाही. सोयीचे हिंदुत्व हे असेच असते. मुंगेरातील हिंदुत्व रक्ताच्या थारोळ्यात पडले. संपूर्ण बिहारवर त्या रक्ताचे शिंतोडे उडाले, पण हिंदुत्वाचे सर्व राजकीय ठेकेदार तोंडावरची मुखपट्टी डोळ्यांवर ओढून गप्प बसले आहेत.  ‘मुंगेर’सारखे हिंदुत्वावरील, दुर्गापूजेवरील हल्ले तर दडपले जातात, पण पालघरात सांडलेले साधूंचे रक्तही उसळत विचारते आहे, मुंगेरात हिंदूंचे रक्त सांडले. त्याविरोधात कधी घंटा बडवणार? निदान थाळय़ा तरी वाजवा! बिहारमध्ये हिंदुत्वावर पोलिसांनी गोळय़ा चालवल्यात हो!   

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here