शिवसेनेचा हल्लाबोल; ‘त्याविरोधात’ कधी घंटा बडवणार? निदान थाळय़ा तरी वाजवा!

मुंबई :

बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात दुर्गा विसर्जनाच्या वेळी पोलिसांनी गोळीबार केला. त्यात एकाचा मृत्यू आणि अनेक जन जखमी झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात भाष्य केले आहे. तसेच भाजपवर जळजळीत टीकाही केली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

मुंगेरातील दुर्गा प्रतिमेचा अवमान व गोळीबार म्हणजे ‘जंगलराज’ आहे असे या ढोंगी डोमकावळ्यांना वाटू नये याचं आश्चर्य वाटतं. एकतर बिहारातील भाजपने डोळ्यांवर ‘सेक्युलर’ चष्मा चढवल्याने त्यांना मुंगेरची आक्रोश करणारी दुर्गामाता दिसत नाही. महाराष्ट्रात मंदिरे उघडा असे ‘घंटानाद’ करून सांगितले जात आहे. मंदिरांची टाळी तोडून आत जाऊ, अशा धमक्या दिल्या जात आहेत. या मंडळींना मुंगेरचा हिंसाचार, हिंदुत्वाचा अवमान याबाबत काहीच घेणं- देणं पडलेलं दिसत नाही. सोयीचे हिंदुत्व हे असेच असते. मुंगेरातील हिंदुत्व रक्ताच्या थारोळ्यात पडले. संपूर्ण बिहारवर त्या रक्ताचे शिंतोडे उडाले, पण हिंदुत्वाचे सर्व राजकीय ठेकेदार तोंडावरची मुखपट्टी डोळ्यांवर ओढून गप्प बसले आहेत.

महाराष्ट्र, प. बंगालसारख्या राज्यांत हे असे काही दुर्दैवाने किंवा अपघाताने घडले की, यांचे हिंदुत्व दक्ष आणि सावधान होते. उत्तर प्रदेशात अबलांवर बलात्कार व खून झाले, साधू आणि पुजाऱ्यांना मंदिरातच निर्घृणपणे मारले गेले. हरयाणात एका मुलीला भररस्त्यात ठार केले. त्या प्रसंगास ‘लव्ह जिहाद’चे लेबल चिकटवून मोकळे झाले. भाजपशासित राज्यांत घडणाऱया या घटनांकडे बेगडी हिंदुत्ववादी अत्यंत संयमाने, तटस्थपणे पाहतात. अशा घटनांचा तपास पोलीस निःपक्षपातीपणे करत असल्याचे हवाले देतात. ‘मुंगेर’सारखे हिंदुत्वावरील, दुर्गापूजेवरील हल्ले तर दडपले जातात, पण पालघरात सांडलेले साधूंचे रक्तही उसळत विचारते आहे, मुंगेरात हिंदूंचे रक्त सांडले. त्याविरोधात कधी घंटा बडवणार? निदान थाळय़ा तरी वाजवा! बिहारमध्ये हिंदुत्वावर पोलिसांनी गोळय़ा चालवल्यात हो!

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here