तर ‘घंटा बजाव’छाप पोकळ हिंदुत्ववाद्यांनी नंगानाच घातला असता; शिवसेनेचा टोला

मुंबई :

बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात दुर्गा विसर्जनाच्या वेळी पोलिसांनी गोळीबार केला. त्यात एकाचा मृत्यू आणि अनेक जन जखमी झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात भाष्य केले आहे. तसेच भाजपवर जळजळीत टीकाही केली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

आपला तो बाब्या आणि दुसऱ्यांचं ते कार्टं, अशा पद्धतीचा कारभार सध्या भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. बिहार, उत्तर प्रदेश, हरयाणा राज्यांत सध्या जे घडते आहे ते पाहता तेथे कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य आहे काय? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, पण ही राज्ये भाजपशासित असल्यामुळेच तेथे सर्व आलबेल आहे. गडबड फक्त महाराष्ट्र, पंजाब, प. बंगालात, राजस्थानातच आहे. बिहारात विधानसभा निवडणुकांची पहिली फेरी संपली आहे. पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांनी बिहारच्या प्रचार सभांत लोकांना विचारलं की, ”तुम्हाला जंगलराज पुन्हा हवे आहे काय? नको असेल तर भाजप आणि जदयुला मतदान करा!” गेल्या पंधरा वर्षांपासून बिहारात नितीशकुमारांचेच राज्य आहे याचा विसर या मंडळींना पडलेला दिसतोय.

मुंगेर जिल्ह्यात दुर्गा विसर्जनाच्या वेळी पोलिसांनी गोळीबार केला. मूर्ती खेचून विसर्जन करायला लावले. गोळीबारात एकजण ठार तर पंधरा लोक जखमी झाले. पोलिसांचे हे कृत्य जनरल डायरला लाजवणारे होते, असा आक्रोश सुरू आहे. दुर्गापूजेच्या विसर्जन यात्रेत हा सर्व गोंधळ झाला व पोलिसांनी सरळ बंदुका चालवल्या. अनुराग पोद्दार हा फक्त 18 वर्षांचा तरुण त्यात मारला गेला. दुर्गापूजा विसर्जनाबाबत हा गोंधळ, हिंसाचार व पोलिसी गोळीबार प. बंगाल, महाराष्ट्रासारख्या राज्यांत घडला असता तर एव्हाना ‘घंटा बजाव’छाप पोकळ हिंदुत्ववाद्यांनी नंगानाच घातला असता. दुर्गापूजेत गोळीबार म्हणजे हिंदुत्वावर हल्ला असल्याचे सांगून थयथयाट केला असता.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here