राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याकडून होतेय मुस्कटदाबी; शिवसेना नेत्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

सांगली :

वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडीमध्ये समन्वय असल्याचे चित्र असले तरी स्थानिक पातळीवर मात्र तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते व दुसऱ्या फळीतील नेते यांच्या कायमच धुसफूस होताना दिसत आहे. स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षांनी जुळवून घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील नेते हस्तक्षेप करताना दिसत असतात. मात्र आता राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्याविरोधात महत्वाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित तक्रार केली आहे.   

जिल्ह्यात शिवसेना पक्षाला आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान दिले जाते आहे, जिल्ह्यात शिवसेनेचा एकमेव आमदार असून त्याचे देखील खचीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे गंभीर आरोपांचे पत्र सांगली जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी केला आहे. सांगलीचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची तक्रार या पत्रात केलेली आहे.

विभुते यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी नुकतीच शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांची ऑनलाईन बैठक घेतली. संघटनात्मक अनेक बाबींवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. यावेळी सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटलांकडून शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न केला जातोय अशी तक्रार सांगितली आहे.

पुढे बोलताना विभूते यांनी ‘महाविकास आघाडी ही विरोधकांना दमवण्यासाठी आहे, त्यांच्या प्रश्नांना प्रत्युत्तर देण्यासाठी आहे. पण आमच्याकडे असणारी महाविकास आघाडी ही शिवसेनेला दाबण्यासाठी आहे की काय? असा प्रश्न आम्हाला पडला आहे’, अशी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here