मुख्यमंत्र्यांना भेटून काय उपयोग, राज्य तर ‘ते’ चालवतात; चंद्रकांत पाटलांचा टोला

अहमदनगर :

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वाढीव वीज बिलासंदर्भात भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी त्यांना शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला आहे. याच पार्श्वभूमीवर ‘मला जर विचारालं तर सांगेन सध्या शरद पवारच राज्य चालवत आहेत. तेच बाहेर फिरत आहेत. उद्धव ठाकरे फिरतच नाहीत. म्हणून राज्यपालांनी राज ठाकरेंना तसं सांगितलं असावं’, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना टोला लगावला.

‘उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी सरकार चालवण्याचे कॉन्ट्रॅक्ट केले आहे. पवारच सध्या सरकार चालवतात. त्यामुळं एखाद्या प्रश्नासाठी पवारांनाच भेटलं पाहिजे,’ असंही पुढे बोलताना पाटील म्हणाले. दरम्यान गेल्या २-३ दिवसात पंकजा मुंडे आणि शरद पवार यांनी एकमेकांचे कौतुक केले. यावरून पाटील यांना विचारले असता ‘पंकजा मुंडेंनी शरद पवारांचे कौतुक केले ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत. मात्र, शरद पवार बाहेर पडतात याचं कौतुक आहे. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. जयंत पाटील यांनीही सांगलीत भाजपच्या नेत्यांचे कौतुक केले आहे’, असे त्यांनी सांगितले.  

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here