भाजपचा ठाकरे सरकारला गंभीर इशारा; मंदिरं १ नोव्हेंबरपर्यंत खुली करा, नाहीतर…

मुंबई :

लॉकडाऊन दरम्यान राज्यातील सर्वच सार्वजनिक ठिकाणे बंद होती. आता टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उघडत आहे. आता बऱ्यापैकी सार्वजनिक ठिकाणे सुरु झाली असली तरी मंदिरे अद्याप सुरु झालेली नाहीत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन केले होते. आता ‘ठाकरे सरकारनं १ नोव्हेंबरपर्यंत मंदिरं खुली करण्याचा निर्णय न घेतल्यास मंदिरांची टाळी फोडू’, असा गंभीर इशारा भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसलेंनी दिला आहे.काही दिवसांपूर्वी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र त्यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळ दिली गेली नाही.

काही दिवसांपूर्वी तुषार यांनी या विषयावरून राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतली होती. त्यावेळी मंदिरं उघडण्याची मागणी करणारं पत्र त्यांनी राज्यपालांना दिलं. आता आक्रमक झालेले तुषार भोसले यांनी सांगितले की, राज्यातील मंदिरं गेल्या ७ महिन्यांपासून बंद आहेत. इतर सर्व गोष्टी सुरू करण्यात आल्या असताना मंदिरं मात्र बंद ठेवली गेली आहेत. मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी याआधी आम्ही राज्यभर घंटानाद आंदोलन केलं. मात्र ठाकरे सरकारनं त्याची दखल घेतली नाही. आता सरकारनं १ नोव्हेंबरपर्यंत मंदिरं खुली करण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा मंदिरांची टाळी फोडू.  

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here