खरी मर्दानगी व मर्दानी तेथेच आहे; ‘त्यावरून’ शिवसेनेचा ‘त्या’ नटीला आणि भाजपला टोला

मुंबई :

भाजप कार्यकर्त्यांना चारेक दिवसांपूर्वी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवता आला नाही, या विषयावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात आज भाष्य करण्यात आले आहे. यावेळी केंद्र सरकारवरही निशाणा साधण्यात आला आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

370 कलम हटवताच कश्मिरी पंडितांची घरवापसी होईल, पंडितांना त्यांचा जमीनजुमला परत मिळेल असे वातावरण भाजपने निर्माण केले. प्रत्यक्षात किती पंडितांची घरवापसी झाली हे गौडबंगाल आहे. भारतीय जनता पक्षाचे काम करणाऱयांच्या हत्या याच काळात केल्या गेल्या हे दुर्दैव आहे. 370 कलम असताना बाहेरच्या लोकांना येऊन तेथे एक इंच जमीन घेता येत नव्हती. बाहेरच्यांना तेथे जाऊन उद्योग, व्यापार करता येत नव्हता. त्यामुळे 370 कलम काढल्यानंतर तेथे व्यापार, उद्योग वाढेल असे चित्र निर्माण केले होते. काही बडय़ा उद्योगपतींनी देशभक्तीने प्रेरित होऊन कश्मीरात मोठी गुंतवणूक करण्याचेही जाहीर केले, पण वर्ष उलटून गेले तरी तेथे

एक रुपयाचीही गुंतवणूक

होऊ शकलेली नाही. बेरोजगारीने वैफल्यग्रस्त झालेले तरुण पुन्हा जुन्याच अतिरेकी मार्गाने निघाले आहेत व ‘370’ प्रेमी पुढारी या तरुणांची डोकी भडकवीत आहेत. कश्मीरातून लेह, लडाख बाजूला काढले. त्या लडाख कौन्सिलच्या निवडणुका भाजपने जिंकल्या व त्याचा विजयोत्सवही साजरा केला. पण मुख्य कश्मीरात तिरंगा फडकवता येत नाही हा पराभव आहे. तिरंगा फडकवू पाहणाऱ्या तरुणांना पोलिसांनी पकडून नेले. हे पोलीस पाकिस्तानचे नव्हते. याच मातीतले होते. कश्मीरात सध्या राष्ट्रपती राजवट आहे. म्हणजे तेथे दिल्लीचा हुकूम चालतो, पण लाल चौकात तिरंगा फडकवणे हा गुन्हा ठरला. मग 370 कलम हटवल्यावर नक्की बदलले काय? मुंबईस पाकव्याप्त कश्मीर म्हणणाऱ्या डुप्लिकेट मर्दानी राणीला दिल्लीचे सरकार केंद्रीय सुरक्षेचे कवच देते. त्या कवचकुंडलात ती महाराणी मुंबामातेचा अवमान करते, पण कश्मीरात भारतमातेच्या सन्मानार्थ तिरंगा फडकवणाऱया तरुणांना खेचून नेले जाते. त्या पोरांना संरक्षण नाही आणि तिरंग्यासही संरक्षण नाही. हे आक्रित आहे. हिंदुत्वाचा संबंध राष्ट्रीयत्वाशी येतो. एखाद्या भूमीवर तिरंगा फडकवण्यास बंदी आहे. याचा सरळसोट अर्थ असा की, त्या भूमीचे आम्ही स्वामी नाही! त्या भूमीवर दुसऱ्याच कुणाचा तरी हुकूम चालत आहे. ते हुकूमबाज एकतर दहशतवादी आहेत अथवा परके आहेत. मुंबईत आजही तिरंगा फडकतोय. म्हणजे हा भाग पाकडय़ांचा नाही. जेथे पाकडय़ांची मिजास चालते तेथेच तिरंग्याचा अपमान होतो. नकटय़ा नटीने लालचौकातील न फडकलेल्या तिरंग्यासाठी संतापाच्या ठिणग्या उडवाव्यात. खरी मर्दानगी व मर्दानी तेथेच आहे!

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here