शिवसेनेनं आणली ती वस्तुस्थिती समोर; ‘त्यांच्या’ हत्या याच काळात केल्या गेल्या हे दुर्दैव

मुंबई :

भाजप कार्यकर्त्यांना चारेक दिवसांपूर्वी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवता आला नाही, या विषयावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात आज भाष्य करण्यात आले आहे. यावेळी केंद्र सरकारवरही निशाणा साधण्यात आला आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

कश्मीरात नक्की काय सुरू आहे याबाबत शंकाकुशंकांना खतपाणी मिळणाऱया घटना, घडामोडी रोज घडताना दिसत आहेत. कश्मीरबाबत देशवासीयांच्या भावना तीक्र आहेत. काँग्रेसच्या काळात कश्मीर हातातून गेलेच होते ते भाजपने परत मिळवले हे जे सांगितले जाते ते खरे असेल तर श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यास विरोध का करण्यात आला? याचे उत्तर देशाला मिळायला हवे (Nation want to know!). कश्मीर हा हिंदुस्थानचाच अविभाज्य भाग आहे हे सिद्ध करण्यासाठीच मोदी सरकारने 370 कलम हटवून कश्मीरच्या पायांतील गुलामीच्या बेड्या तोडून फेकल्या. त्याबद्दल सगळ्यांनीच कौतुकाचा वर्षाव केला. 370 कलम हटवून भारतमातेचा गुदमरलेला श्वास मोकळा केला. हे सर्व मोदी व शहा यांचे राज्य दिल्लीत असल्यामुळेच घडले, पण 370 कलम हटवूनही भाजप कार्यकर्त्यांना चारेक दिवसांपूर्वी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवता आला नाही. लाल चौकात तिरंगा फडकवण्यास गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांना कश्मीरच्या पोलिसांनी रोखले व बंदी बनवले. हे चित्र काय सांगते? म्हणजेच कश्मीरची स्थिती अजूनही सुधारलेली नाही. जे बरे दिसत आहे तो फक्त वरवरचा मेकअप आहे. आता कश्मीरातील तीन प्रमुख पक्ष एकत्र आले आहेत व त्यांनी 370 कलम पुन्हा आणण्यासाठी लढा उभारण्याचे ठरवले आहे. डॉ. फारुख अब्दुल्ला या बेडकाने तर ‘डराव डराव’ करत असे जाहीर केले की, 370 कलम पुन्हा आणण्यासाठी आम्ही चीनची मदत घेऊ. हा सरळसरळ राष्ट्रद्रोहच आहे. दुसरी ती बेडकीण मेहबुबा मुफ्ती. तिने तर ‘कश्मीरात तिरंगा कसा फडकतो ते पाहू’ असे आव्हान दिले आहे. या

दोन्ही नेत्यांची भाषा

फुटीरतेची आणि चिथावणीची आहे. तिरंग्याचा अवमान हिंदुस्थान कधीच सहन करणार नाही. ही देशभावना आहे. गेल्या 5 ऑगस्टला घटनेतील 370 कलम काढून फेकून देण्यात आले. तोपर्यंत जम्मू-कश्मीरला वेगळे निशाण व वेगळे संविधान होते आणि हा प्रकार भारतमातेच्या काळजात सुरी खुपसल्याप्रमाणे वेदना देत होता. या दोन तरतुदींमुळे जम्मू-कश्मीर हे हिंदुस्थानच्या नकाशावर असूनही हिंदुस्थानच्या पोटातील स्वतंत्र राष्ट्र म्हणून डरकाळ्या फोडीत होते. मोदी-शहा यांनी हे स्वतंत्र राष्ट्र बरखास्त केले हे खरे. पण आजही कश्मीरात तिरंगा फडकवण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर कसे व्हायचे? 370 कलम हटविल्यानंतरही स्थिती ‘जैसे थे’ आहे व लोकांवर बंधने आहेत. लष्कराचा बंदोबस्त पूर्वीपेक्षा जास्त वाढला आहे. दहशतवादी हल्ल्यांचे भयही जास्त निर्माण झाले आहे. 370 कलम हटवताच कश्मिरी पंडितांची घरवापसी होईल, पंडितांना त्यांचा जमीनजुमला परत मिळेल असे वातावरण भाजपने निर्माण केले. प्रत्यक्षात किती पंडितांची घरवापसी झाली हे गौडबंगाल आहे. भारतीय जनता पक्षाचे काम करणाऱयांच्या हत्या याच काळात केल्या गेल्या हे दुर्दैव आहे. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here