मराठा आरक्षणावरून संभाजीराजेंचा संताप; म्हणाले…

मुंबई :

सध्या राज्याच्या राजकीय पटलावर मराठा आरक्षणावरून वादविवाद सुरु आहेत. अशातच मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवेळी राज्य सरकारी वकील उपस्थित नसल्यामुळं राज्य सरकारला टीकेचे धनी व्हावे लागले. याच पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक होत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकार समन्वयानं काहीही करताना दिसत नाही. मी अनेकदा सरकारला सूचना केल्यात. अशोक चव्हाण  यांच्याशी बोलणं झालं आहे. पण उपसमितीची बैठक झालेली नाही.

पुढे बोलताना त्यांनी ‘राज्य सरकार असं का करतेय? मराठा समाजाला असं गृहित का धरता? का खेळखंडोबा करता? असा खडा सवालही उपस्थित केला. मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष असलेल्या अशोक चव्हाणांनी याकडं लक्ष द्यायला हवं. ते जिथं कुठं असतील तिथून त्यांनी समन्वय साधायला हवा. सामान्य प्रशासन विभागाच्या संबंधित सचिवांना सूचना द्यायला हव्या, असेही पुढे बोलताना त्यांनी सुचवले.

संतप्त झालेल्या संभाजीराजेंनी पुढे बोलताना ‘किती बोलायचं? सरकारला आणखी काय सांगायचं? फोन करून काय करू? अशोक चव्हाणांना ह्या गोष्टी कळत नाहीत का?, असेही प्रश्न उपस्थित केले. माझा जीव धोक्यात घालून मी महाराष्ट्रात फिरतोय. गर्दीत फिरतोय. सरकारनं गांभीर्यानं पावलं उचलावीत. अजूनही वेळ गेलेली नाही, एवढीच माझी विनंती आहे, असे आवाहन संभाजीराजेंनी केले.  

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here