शिवसेनेनं केले सरसंघचालकांचे जाहीर कौतुक; भाजपला खडसावले, वाचा काय आहे प्रकार

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात काल झालेल्या दसरा मेळाव्यात मांडलेले मुद्दे आणि त्या अनुषंगाने येणारे विषय यावर भाष्य केले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व गोमातेच्या भोवती फिरते आहे व त्यातून देशात मोठा खूनखराबा झाला. वीर सावरकरांचे गाईबाबतचे मत वेगळे होते. गाईला ते हिंदुत्वाचे प्रतीक मानायला तयार नव्हते. गाय हा एक उपयुक्त पशू पिंवा प्राणी आहे एवढेच त्यांचे मत, पण भाजपातील हिंदुत्ववाद्यांनी गाईवरून हिंदू-मुसलमानांत दंगली भडकवल्या व राजकारण केले. ‘माय मरो आणि गाय जगो’ हे आमचे हिंदुत्व नाही. महाराष्ट्रात गोमाता आणि गोव्यात जाऊन खाता? हेच का तुमचे हिंदुत्व? असा टोकदार भालाच उद्धव ठाकरे यांनी भाजपला खुपसला आहे. भाजपशासित अनेक राज्यांत गाई कापल्या जातात व खाल्ल्या जातात हे वास्तव आहे. त्यामुळे भाजपचे गाईचे हिंदुत्व तकलादू आहे व श्री. ठाकरे यांनी त्या तकलादू भूमिकेची चिरफाड करत लक्तरे वेशीवर टांगली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था आहे. त्यामुळे सरसंघचालक काय सांगतात ते अनेकदा दिशादर्शक ठरते. संघाचा हिंदू विचार कधीच लपून राहिला नाही. अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन झाले, त्या सोहळय़ास सरसंघचालक मोहन भागवत विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. अयोध्येत राममंदिर व्हावे ही संघाची भूमिका होतीच, पण ‘कोरोना’ महामारीची पर्वा न करता सर्व मंदिरे खुली करा, असे श्री. भागवत कधीच सांगणार नाहीत. मंदिरांत गर्दी झाली तर महामारीचे संकट वाढेल असा

विज्ञानवादी दृष्टिकोन

ठेवणाऱ्यांपैकी सरसंघचालक आहेत. घंटा बडवून, थाळ्या वाजवून कोरोना पळून जाणार नाही. त्यासाठी आरोग्यविषयक कठोर नियम-शिस्तीचे पालन करावेच लागेल, लसीवर संशोधन करावेच लागेल असे मानणारे सरसंघचालक आहेत. भारतीय जनता पक्षाचे जे लोक मंदिरासाठी थाळ्या बडवत आहेत व छाती पिटत आहेत त्यांनी सरसंघचालकांकडून हिंदुत्वाचे धडे घ्यायला हवेत.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here