शिवसेनेकडून सरसंघचालकांचे कौतुक, राज्यपालांना टोले; वाचा, नेमकं काय म्हटलं आहे सामनात

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात काल झालेल्या दसरा मेळाव्यात मांडलेले मुद्दे आणि त्या अनुषंगाने येणारे विषय यावर भाष्य केले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

दसऱ्याच्या निमित्ताने दोन मेळावे गाजले. पहिला नागपूरचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक विजयादशमी मेळावा, दुसरा अर्थातच मुंबईतील शिवसेनेचा दसरा मेळावा. कोरोनामुळे दोन्ही मेळावे बंद सभागृहांत झाले, पण मेळाव्यांच्या प्रमुख सूत्रधारांनी मांडलेले हिंदुत्वाबाबतचे विचार देशभर पोहोचले आहेत. दोन्ही व्यासपीठांवरील भाषणे म्हणजे सडेतोड तोफखानेच ठरले! सरसंघचालक मोहन भागवत यांनी दसरा मेळाव्यात हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट करून सांगितली आहे. संघाच्या दृष्टिकोनातून हिंदुत्वाचा अर्थ व्यापक असून पूजा पद्धतीशी जोडून त्याला संपुचित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हिंदुत्व हे देशाच्या स्वत्वाचे सार असल्याची भूमिका श्री. भागवत यांनी मांडली. हिंदुत्व ही जणू आपलीच मक्तेदारी, जे भाजपबरोबर नाहीत ते हिंदू नाहीत अशा विपृत विचारसरणीपर्यंत काही ठेकेदार पोहोचले असतानाच सरसंघचालकांनी त्या ठेकेदारांचे दात नागपुरात घशात घातले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल श्रीमान भगतसिंग कोश्यारी यांनी संघाची काळी टोपी घालून उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचे धडे देण्याचा प्रयत्न करून पाहिला. महाराष्ट्रातील मंदिरे उघडणार की नाही? तुम्ही हिंदुत्व सोडले आहे काय? तुम्ही सेक्युलर झालात काय? असे प्रश्न राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारले. त्यास उद्धव ठाकरे यांनी खणखणीत उत्तर दिलेच, पण आता सरसंघचालकांनीही यावर खडे बोल सुनावले आहेत. शिवतीर्थावरील मेळाव्यात (वीर सावरकर स्मारकाच्या सभागृहातील) मुख्यमंत्र्यांनी भाजपातील हिंदुत्वाच्या राजकीय ठेकेदारांना सुनावले आहे की, हिंदुत्व म्हणजे काय ते सरसंघचालकांकडून शिका. यावर पुढे जाऊन श्री. ठाकरे यांनी खडसावले आहे की, घंटा बडवणं, थाळ्या पिटणं हे आमचं हिंदुत्व नाही. त्याने काही होत नाही. मुंबईला पाकव्याप्त कश्मीरची उपमा देणाऱया नटीचा आदरसत्कार करणे हे काही आमच्या हिंदुत्वात बसत नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मारलेला हा टोला राजभवनाला अस्वस्थ करणारा आहे. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here