अजित पवारांना कोरोनाची बाधा; वाचा, सुप्रिया सुळेंनी दिलेला भावनिक संदेश

पुणे :

राज्यात कोरोनाचा वेग जरी मंदावला असला तरी, कोरोना होण्याचे सत्र सुरूच आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी बंधू अजितदादांना  ‘दादा, लवकर बरे व्हा’ असा संदेश दिला आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते रुग्णालयात दाखल झाले आहेत.दादा लढवय्ये आहेत. महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छा यांच्या बळावर कोरोना आजाराला पराभूत करुन लवकरच सर्वांच्या सोबत येतील. दादा, लवकर बरे व्हा.

आज सकाळी स्वतः ट्वीट करत अजितदादांनी आपण बाधित असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. 

माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन, असा विश्वासही अजितदादांनी व्यक्त केला. थकवा आणि अस्वस्थता जाणवत असल्याने गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांनी स्वतःला होम क्वारंटाइन केले होते.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here