आठवडयाच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण; वाचा, किती झाली घट

मुंबई :

सोन्याचे भाव सध्या एकदमच अस्थिर आहेत. कधी अचानक घट तर कधी अचानक वाढ होत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी मोठ्या प्रमाणात होईल, असे अंदाज बांधले जात असताना वास्तवात कोणतीही मोठ्या प्रकारची उलाढाल या क्षेत्रात झालेली नाही. अशातच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात काही प्रमाणत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. आजच्या सुरुवातीच्या व्यापारात एमसीएक्सवर डिसेंबर डिलीव्हरीसाठीचे सोन्याचे दर 0.3 % टक्क्यांनी घसरून 50679 प्रति 10 ग्रॅमवर आला, तर चांदीचा वायदा 1.12 % घसरून 61,749 रुपये प्रति किलोवर पोहोचला. 

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर सातत्याने खाली कोसळत होते. ५७ हजाराला टेकलेले सोने आता थेट ५० हजारांवर आले होते. आता चालू महिन्यात भाव कमी-जास्त होत आहेत. अमेरिकेची निवडणूक जवळ आलेली आहे. या पार्श्वभूमीवर तिथे अनेक घडामोडी घडत आहेत. त्याचा व्यावसायिक क्षेत्रावर परिणाम होत आहे. जगभरातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या अमेरिकेत आर्थिक पॅकेजबाबत अद्यापही अनिश्तितता आहे. परिणामी सोन्याच्या किंमती सातत्याने उतरत आहेत. परदेश बाजाराचा परिणाम देशांतर्गत बाजारावर नेहमी दिसून येत असतो.

परदेशी बाजारात सोन्याचे दर आज एक आठवड्याच्या नीचांकावर खाली आले. यूएस मध्ये प्रोत्साहन पॅकेजसंदर्भातील घोषणेमुळे डॉलर मजबूत झाला. मात्र, अमेरिकेत कोरोना विषाणूची नोंद झाली असल्याने सोन्यात मोठी घसरण झाली नाही. परदेशी बाजारात आज स्पॉट गोल्ड 0.1 टक्क्यांनी घसरून 1,899.41 डॉलर प्रति औंस झाला. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here