संतप्त नितीन गडकरींचे उद्गार; ‘अशा’ लोकांची धुलाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये

नागपूर :

‘माझा स्वभाव संवेदनशील आहे. लोकांचं वाईट करण्याचा नाही, पण आता मला वाटत अशा लोकांची धुलाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. हे काम पूर्ण झाले बघण्यासाठी तीन सरकारं बदलून गेली. मग मी तुमचं काय अभिनंदन करू. मला अभिनंदन करायचीही लाज वाटतेय’, असे म्हणत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध असलेले गडकरी यांच्या हस्ते केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचं उद्घाटनप्रसंगी बोलत असताना त्यांनी हे उद्गार काढले. पुढे बोलताना संतापलेले गडकरी म्हणाले की, अशा कार्यक्रमात प्रथा असते की, कोणतंही काम पूर्ण झाल्यानंतर सगळ्यांचं अभिनंदन केलं जातं. पण मला संकोच वाटतोय की, तुमचं अभिनंदन कसं करू? कारण २००८मध्ये निश्चित झालं होत की, अशा पद्धतीची इमारत उभारण्यात येईल. २०११ मध्ये याची निविदा निघाली आणि हे दोनशे अडीचशे कोटींचं काम नऊ वर्षांनंतर आज पूर्ण झालं आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी लागलेल्या वेळेत तीन सरकारं आणि आठ अध्यक्ष राहिले. त्यानंतर आज हे काम पूर्ण झालं आहे.

पुढे बोलताना त्यांनी या कामासंबंधीच्या अधिकाऱ्यांना टोलाही लगावला. ते म्हणाले की, सध्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्षांचा याच्याशी काही संबंध नाहीये. पण ज्या महान लोकांनी २०११ पासून २०२० पर्यंत हे काम केलंय, त्यांचे फोटो या कार्यालयात लावण्याचा प्रयत्न करा.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here