तेजीची नांदी! दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘या’ क्षेत्रात दिसली मोठी उलाढाल

मुंबई :

कोरोनामुळे आर्थिक जगतावर आलेले सावट हे प्रचंड मोठे आहे. यामुळे मोठमोठ्या कंपन्या आणि दिग्गज व्यवसायिक दिवाळखोर ठरले आहेत तर सामान्य माणसालाही मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. अशातच सर्व पूर्वपदावर येत असल्याची चिन्हे आहेत. साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक व्यवसायांना मोठा लाभ होणार असल्याचेही संकेत होते. हा मुहूर्त मुंबईकरांनी अचूक साधला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वाहन खरेदीच्या संख्येत १९७ वाहनांची भर पडली आहे.

दसरा हा खरेदीसाठी शुभमुहूर्त समजला जातो. त्यामुळे अनेक लोक विविध उपयोगी वस्तू, यंत्र, सोने आणि सर्वात जास्त प्रमाणात गाड्यांची खरेदी करतात. यावर्षी मोठ्या प्रमाणात झालेली गाड्यांच्या खरेदीमुळे बाजारात पुन्हा तेजी आली असल्याचे दिसत आहे. मुंबईतील चार आरटीओंमध्ये एकूण ८२१ गाड्यांची नोंदणी करण्यात आली. यात ५५४ दुचाकी व २६७ चारचाकी वाहनांचा समावेश आहे. गतवर्षी दसऱ्याला ४३० दुचाकी आणि १९७ चारचाकींसह एकूण ६२७ वाहनांची नोंद झाली होती.

या गाड्यांच्या मोठ्या प्रमाणावर खरेदीमुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल वाहन क्षेत्रात झाली आहे. परिणामी सरकारी तिजोरीतही फार मोठी नाही पण थोडी का होईना भर पडली आहे. मुंबईतील चारही आरटीओंच्या माध्यमातून सरकारला एकाच दिवसात तब्बल २ कोटी ४० लाखांचा कर प्राप्त झाला आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here