बिहार निवडणूक; रक्तरंजित प्रचाराचा थरार; ‘या’ पक्षाच्या उमेदवाराची गोळय़ा झाडून हत्या

पटना :

देशाच्या राजकीय पटलावर बिहार विधानसभा निवडणूक विविध कारणांमुळे चर्चेत आहे. त्या अनुषंगाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. आज बिहार निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचार संपणारच होता. अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहार निवडणुकीने एक वेगळेच वळण घेतले आहे. जनता दल राष्ट्रवादीच्या (जेडीआरपी) उमेदवाराची गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली. अजून एक धक्कादायक बाब म्हणजे या गोळीबारात एका कार्यकर्त्याचाही मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर गोळी झाडून पळणाऱया एका हल्लेखोराला संतप्त जमावाने पकडले. नंतर त्याला बेदम मारहाण केली गेली. या मारहाणीत हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान बिहार पोलिसांनी या प्रकरणी अजून दोघांना अटक केली आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचार अशा रक्तरंजित टप्प्यावर येऊन ठेपला आहे.

श्रीनारायण सिंह असे हत्या झालेल्या उमेदवाराचे नाव आहे. सिंह व त्याच्या कार्यकर्त्याला गंभीर जखमी अवस्थेत सुरुवातीला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोघांना मृत घोषित करण्यात आले.

शिवहर जिल्ह्यातील हथसार गावात ही गंभीर घटना घडली. सिंहच्या छाती व शरीराच्या इतर भागांत तीन गोळ्या लागल्या. हल्लेखोर कार्यकर्ते असल्याचे भासवून सिंहच्या प्रचारफेरीत सहभागी झाले होते. हल्लेखोरांची नावे अद्यापही उघडकीस आलेली नाहीत.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here