सोने सावरले, चांदी स्वस्त; वाचा, दसऱ्याला सोने खरेदीत काय झालं, घट का वाढ?

मुंबई :

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री होणार असे दिसत होते मात्र वस्तावर चित्र मात्र वेगळेच होते. गेल्या काही महिन्यात सोने खरेदी अगदी २०% वर आली होती. गेल्या महिन्यात मात्र त्यात चांगलीच वाढ झाली. आता दसऱ्यापासून सोने खरेदीत मोठी वाढ होणार, असे वाटत असताना  ग्राहकांनी खरेदी ऐवजी चौकशी करणे पसंत केले. गत वर्षाच्या तुलनेत यंदा सोने विक्रीत ५० ते ६० टक्के घसरण झाल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एका संपूर्ण मुहूर्त असलेला दसऱ्याला सोने खरेदी होईल आणि आपलीही चांदी होईल असे सोने व्यावसायिकांना वाटत असताना प्रत्यक्षात मात्र सोने खरेदीला अपेक्षित असा प्रतिसाद मिळालेला नाही. गेल्या वर्षी दसऱ्याला सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ३८ हजारांच्या आसपास होता. यंदा तो ऑगस्टमध्ये ५६२०० रुपयांवर गेला होता. चालू महिन्यात ५० ते ५२ हजाराच्या आसपास भाव चालू आहे.

दरम्यान कमॉडिटी बाजारात सोने दरात शुक्रवारी वाढ झाली होती. सोन्याचा भाव १०० रुपयांनी वधारून ५०७६६ रुपयांवर बंद झाला. चांदीच्या दरात मात्र १९० रुपयांची घट झाली. एक किलो चांदीचा भाव ६२४२५ रुपयांवर स्थिरावला. येते काही महिने सोन्याचे भाव स्थिर राहतील. त्यात विशेष बदल होणार नाहीत, असा अंदाज सांगितला जात आहे. वर्षाच्या शेवटी मात्र भाव वाढू शकतात. डिसेंबरच्या अखेरीस सोन्यानं आतापर्यंतचा उच्चांक गाठलेला असेल, असे मत सराफा बाजारातील व्यावसायिकांनी व्यक्त केले. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here