संजय राऊतांनी सांगितली ‘ती’ परीस्थिती; सर्व काही शांत आहे पण हिंदू धर्म…

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोक या सदरातून शिवसेना नेते व सामनाचे संपादक संजय राऊत यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर खास ठाकरे शैलीत कौतुक करत फटकारले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे रोखठोकमध्ये :-

दसऱ्याच्या उत्सवात आजही पालख्या निघतात, सोने लुटतात, पण शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात विचारांचे सोने जनतेवर उधळणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कोठे आहेत? सोने लुटताना तोफगोळे सोडणारे, विरोधकांच्या गंडस्थळावर हल्ला करून दाणादाण उडवणारे बाळासाहेब ठाकरे हे ज्यांनी शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात पाहिले आहेत, त्यांनाच सीमोल्लंघन कशाला म्हणतात ते कळेल.

उत्तर प्रदेशात हाथरस बलात्कार प्रकरण घडले. एका वाल्मीकी समाजाच्या मुलीवरील बलात्कार, हत्या प्रकरणाने देशाच्या चारित्र्याची लक्तरेच बाहेर पडली. त्यानंतर तेथील हिंदू दलित समाज प्रचंड दहशतीखाली जगू लागला. आता बातमी आली उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील 250 दलितांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतर करणाऱ्यांत 65 वर्षांचा इंदर राम आहे. दिल्लीतील शहादरा येथे तो राहतो. हाथरस प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील हिंदू दलितांना सामाजिक बहिष्कारास सामोरे जावे लागले. बौद्ध धर्मात जातपात नाही. तेथे कोणी ठाकूर नाही, वाल्मीकी नाही. प्रत्येक जण मनुष्य आहे आणि सगळे जण बौद्ध आहेत. धर्मांतराशिवाय दुसरा मार्ग नव्हता असे इंदर राम सांगतात. अयोध्येत हिंदुत्वाचे राममंदिर उभे राहत आहे, पण इंदर ‘राम’ने हिंदू धर्मच सोडला. दसऱ्याला हिंदुत्वाच्या पालख्या मिरवल्या जातील, विचारांचे सीमोल्लंघन होईल, पण जाती प्रथेस कंटाळून हिंदू समाज धर्मांतर करीत आहे. पाकिस्तानातील हिंदूंची चिंता वाहणे हे राजकारण सोपे आहे. आपल्या डोळ्यांसमोर इंदर राम हिंदू धर्माचा त्याग करतोय. हा दसरा नेहमीपेक्षा खरेच वेगळा आहे. सर्व काही शांत आहे, पण हिंदू धर्म अस्वस्थ आहे. दसऱ्याच्या निमित्ताने त्याचे सीमोल्लंघन होऊ द्या!

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here