लष्कर कँटीन्सच्या वस्तूंबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ‘त्या’ वस्तूंवर…

दिल्ली :

लष्कर कँटीन्स आपल्या सर्वाना एकाच कारणामुळे परिचित आहेत. ते म्हणजे या लष्कर कँटीन्समध्ये मद्य, इलेक्ट्रॉनिक आणि इतर अनेक गृहपयोगी वस्तू स्वस्त मिळतात. लष्कराचे जवान, अधिकारी तसेच माजी जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना ही सुविधा उपलब्ध आहे. मात्र आता केंद्र सरकारने लष्कर कँटीन्सच्या वस्तूंबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने देशभरातील चार हजार लष्कर कँटीन्सना आयात होणाऱ्या वस्तूंची खरेदी रोखण्याचा आदेश दिला आहे.

रॉयटर्न या वृत्तसंस्थेने केंद्र सरकारच्या सदर निर्णयाविषयीची माहिती समोर आणली आहे. आदेशात असलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात हा निर्णय घेण्यासाबंधी लष्कर, हवाई दल आणि नौदलाशी चर्चा करण्यात आली होती. भविष्यात थेट आयात केलेल्या वस्तूंची खरेदी केली जाणार नाही.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींने जाहीर केलेल्या स्वदेशी मोहिमेला पाठिंबा देण्याचाही उद्देश या निर्णयातून पूर्ण होईल. सदर आदेश १९ ऑक्टोबरला संरक्षण मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान या निर्णयासंबंधी संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांशी संवाद साधला असता संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. जवळपास २०० कोटी डॉलर्सची उलाढाल लष्कर कँटीन्समध्ये होते.आदेशात नेमक्या कोणत्या वस्तूंवर बंदी आहे हे स्पष्ट करण्यात आलं नाही. मात्र यामध्ये आयात होणाऱ्या मद्याचा समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here