आदित्य बिर्ला फॅशनमध्ये ‘या’ बड्या अंतरराष्ट्रीय कंपनीची हिस्सेदारी; वाचा, कसा झाला करार

मुंबई :

आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड म्हणजे एबीएफआरएल आता आपला विस्तार आणि व्याप वाढवत आहे. अशातच त्यांना एका मोठ्या कंपनीने साथ दिली आहे. वॉलमार्टने मालकी मिळविलेल्या फ्लिपकार्ट समूहाने आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड मध्ये १,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून ७.८ टक्के हिस्सा अधिग्रहित केला आहे.

कंपनीवर सध्या २,७७६ कोटी रुपयांचे कर्ज आहे. या गुंतवणुकीमुळे कंपनीवर असलेला कर्जाचा भर काहीसा हलका होऊ शकणार आहे. यानंतर कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आदित्य बिर्ला फॅशन या भांडवली गुंतवणुकीच्या माध्यमातून आपला आर्थिक ताळेबंद भक्कम करणार आहे. तसेच  नव्या तडफेने आपल्या विस्तार महत्त्वाकांक्षांच्या पूर्ततेच्या दिशेने पावले उचलणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.  आदित्य बिर्ला फॅशन कंपनीची सध्या ३,००० च्या आसपास विक्री दुकाने आहेत. या ३००० दालनांमध्ये पँटालुन्सचाही समावेश आहे.

१,५०० कोटींच्या मोबदल्यात ७.८ टक्के हिस्सेदारी, म्हणजे प्रति समभाग २०५ रुपये मोजण्यात आले. आदित्य बिर्ला फॅशनच्या गुरुवारी भांडवली बाजारातील समभागाच्या १५३.४० रुपये या बंद भावाच्या तुलनेत ३३.६ टक्के अधिक किंमत या व्यवहारासाठी फ्लिपकार्टकडून देण्यात आली.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here