म्हणून दसऱ्याला झाली झेंडूच्या मागणीत घट; भावातही घसरण

पुणे :

दरवर्षी अगदी दसऱ्याच्या आधल्या रात्रीपासूनच झेंडूच्या फुलाची आवक बाजारात झालेली असते. त्या काळात घाऊक आणि किरकोळ बाजारात अन्य फुलांच्या तुलनेत झेंडुच्या मागणीत वाढ होते. परिणामी झेंडूचा भाव वाढलेला दिसत असतो. यावर्षी मात्र परिस्थिती वेगळी आहे. मार्चपासून अनेक मोठे सण-उत्सव झाले मात्र दरवर्षीसारख्या गोष्टी यावर्षी घडल्या नाहीत. यावर्षी झेंडूच्या फुलाला मागणी कमी आहे. कोरोनाचा मोठा फटका झेंडूलाही बसल्याचे दिसत आहे. एक किलो झेंडूला प्रतवारीनुसार 50 ते 100 रुपये असा भाव मिळाला आहे.  

साडेतीन मुहुर्तापैकी संपूर्ण मुहुर्त असलेला दसऱ्याला यावर्षी बाजारात झेंडूची फुले मोठ्या प्रमाणात दिसतील परंतु मागणी मात्र कमी दिसत आहे, परिणामी भावही घसरलेले आहेत. त्यातल्या त्यात चांगल्या प्रतीच्या सुक्या झेंडुला जास्त भाव मिळत आहेत. मार्केटयार्डातील फूल व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले की, रात्री पासून फूल बाजारात झेंडुची आवक सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातील वाई, सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी, करमाळा, पुणे-सोलापूर रस्त्यावरील हवेली तालुक्यातील गावे तसेच बुलढाणा भागातून झेंडुची आवक होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा झेंडुला मागणी तसेच आवक कमी आहे. शनिवारी ( 24 ऑक्टोबर) झेंडुची आवक वाढेल.

बाजार समितीच्या फूल बाजार विभागाचे प्रमुख प्रदीप काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्केटयार्डातील घाऊक फूल बाजारात 43 हजार 344 किलो झेंडुची आवक झाली. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार 30 ते 70 रुपये किलो असा झेंडुला भाव मिळाला आहे. शनिवारी ( 24ऑक्टोबर) झेंडुची आवक वाढेल. झेंडूसह कागडा, शेवंती, गुलछडी, अस्टर, लिली, गुलाब या फुलांची बाजारात आवक झाली.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here