भाजपचे राष्ट्रवादीवर टीकास्र; ‘त्या’ घोटाळ्याचा प्रमुख साक्षीदार फोडला पण…

मुंबई :

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकला असून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्यानंतर अनेक समीकरण बदलताना पाहायला मिळत आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी खडसेंवर टीका करत त्यांना घेरले आहे. अशातच माजी मंत्री राम शिंदे यांनी ‘ ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा प्रमुख साक्षीदार फोडला तरी आता त्याचा उपयोग होणार नाही, या घोटाळ्यातील आरोपींवर निश्चित कारवाई होईल’, असे म्हणत राष्ट्रवादीला टोला लगावला आहे.

शिंदे यांनी म्हटले आहे की, एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते असताना ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे ते प्रमुख साक्षीदार होते, ईडीची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. ही चौकशी अंतिम टप्प्यात असताना प्रमुख साक्षीदार फोडण्याचं काम राष्ट्रवादीने केलं आहे. परंतु चौकशीत खडसेंची साक्ष होऊन गेली, त्यामुळे आता या साक्षीदाराचा उपयोग होणार नाही. त्यामुळे या घोटाळ्यातील दोषींवर निश्चितच कारवाई होईल.

पुढे बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले की, भाजपा देशातील सर्वात मोठी पार्टी आहे. सर्वाधिक राज्य, मुख्यमंत्री, खासदार आहेत, कधी नव्हे तर काँग्रेस वगळता कोणत्याही पक्षाला बहुमत नव्हतं ते नरेंद्र मोदींना मिळालं आहे. जयंत पाटील सांगतात १० ते १२ आमदार संपर्कात आहेत, परंतु एकही आमदार, माजी आमदार एकनाथ खडसेंसोबत गेला नाही, कोणीही भाजपा सोडणार नाही.   

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here