‘त्या’ नव्या लसीची देशाला गरज; शिवसेनेचा टोला

मुंबई :

देशाच्या राजकीय पटलावर बिहार निवडणुका चर्चेत आहेत. भाजपने तिथे कोरोना लसीबाबत दिलेले आश्वासनावरून अनेक नवे वाद निर्माण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून या विषयावर भाष्य करत भाजपवर टीकाही केली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

‘बाजारात तुरी आणि…’ या म्हणीप्रमाणे बाजारात लस आली नाही तोवर यांच्या मारामाऱया सुरू झाल्या आहेत. प. बंगाल, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ, ओडिशा, पंजाब, राजस्थान अशा राज्यांत भाजप विचारांची सरकारे नाहीत. दिल्ली प्रदेशात केजरीवाल भाजप विरोधाचा झेंडा घेऊन उभे आहेत. या राज्यांतील सरकारांनी पुतीनकडून लस मागवायची काय? देशातील 130 कोटी जनतेला कोरोना लस देण्यासाठी केंद्र सरकारला किमान 70 हजार कोटी लागणार आहेत व नागरिकांना जग्aावायची जबाबदारी केंद्राला झिडकारता येणार नाही. बिहार हा देशाचाच भाग आहे.

बिहारने केंद्राकडे विशेष दर्जा देण्याची मागणी सातत्याने केली. कारण नितीशकुमार मुख्यमंत्री असले तरी राज्य कायम मागासलेलेच राहिले. लोक उपासमार, भूकबळीने किडय़ामुंग्यांसारखे मरत असल्याचा अहवाल जागतिक संघटनेनेच प्रसिद्ध केला. बिहारला ‘लस’ मिळावी याबाबत दुमत नाही, पण इतर राज्ये काही पाकिस्तानात नाहीत. कोरोना लसीचा मुद्दा भाजपच्या बिहारी घोषणापत्रात यावा हे योग्य नाही. लसीचे वितरण सरकारची व राष्ट्रीय भूमिका असायला हवी. ही एक प्रकारे भेदाभेदीच आहे. राष्ट्रीय एकात्मतेस नव्या लसीची गरज आहे!

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here