…तर आधी पक्षांतर करा, नाहीतर बसा बोंबलत; संतप्त शिवसेनेचे फटकारे

मुंबई :

देशाच्या राजकीय पटलावर बिहार निवडणुका चर्चेत आहेत. भाजपने तिथे कोरोना लसीबाबत दिलेले आश्वासनावरून अनेक नवे वाद निर्माण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून या विषयावर भाष्य करत भाजपवर टीकाही केली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

मतदारांना भीती दाखवून लस टोचण्याचा हा प्रकार निवडणूक आयोगाच्या नजरेतून सुटला कसा? स्वातंत्र्यपूर्व काळात ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दुंगी’ असा मंत्र होता. तो भारतमातेचा आक्रोश होता. त्याच धर्तीवर ‘तुम मुझे व्होट दो, हम तुम्हे लस देंगे!’ असा नारा दिलेला दिसतोय. सत्ता मिळविण्यासाठी मतदारांना भुरळ घालण्यासाठी नैतिकतावाले पक्ष कोणत्या थराला जाऊ शकतात ते आता दिसले. मोफत लस फक्त बिहारलाच का? संपूर्ण देशाला का नाही? याचे आधी उत्तर द्या. संपूर्ण देशात कोरोनाचे थैमान आहे, 75 लाखांच्या पुढे आकडा गेला आहे, माणसे रोज प्राण गमावत असताना लसीचे राजकारण व्हावे, तेही एका राज्याच्या निवडणुकीसाठी हे धक्कादायक आहे. बिहारच्या निवडणुकीतून ‘विकास’ हरवला आहे. रोटी, कपडा, मकान, रोजगार हे मुद्दे चालत नाहीत.

कारण त्याबाबत सगळा दुष्काळच आहे. सर्वत्र बेरोजगारी व गरिबीचा कहर आहे. त्यावर उतारा म्हणून मोफत लस टोचण्याचा प्रयोग सुरू झाला आहे. संपूर्ण देशालाच कोरोनावरील लसीची गरज आहे. लसीचे संशोधन तिसऱ्या टप्प्यात पोहोचले आहे, पण ‘लस’ आधी बिहारात भाजपास मतदान करणाऱयांना मिळेल, पण समजा बिहारात सत्ताबदल झाला तर भाजप ही लस बिहारला देणार नाही काय? अनेक राज्यांत भाजपची सरकारे नाहीत. त्यांनाही ‘लस’ देण्याबाबत केंद्र सरकार हात आखडता घेणार काय? विरोधी पक्षाच्या एखाददुसऱ्या आमदारास कोरोना झालाच तर भाजपतर्फे सांगितले जाईल, ”लस टोचून घ्यायची असेल तर आधी पक्षांतर करा, नाहीतर बसा बोंबलत!” त्यामुळे कोरोनावरील मोफत लसीने लोकांत संभ्रम निर्माण केला आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here