‘तो’ चिरडून मरणार व राजकीय क्रांती होणार असेच चित्र; शिवसेनेचा भाजपवर थेट हल्लाबोल

मुंबई :

देशाच्या राजकीय पटलावर बिहार निवडणुका चर्चेत आहेत. भाजपने तिथे कोरोना लसीबाबत दिलेले आश्वासनावरून अनेक नवे वाद निर्माण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून या विषयावर भाष्य करत भाजपवर टीकाही केली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

भारतीय जनता पक्षाचे नक्की धोरण काय? त्यांचे दिशादर्शक कोण? याबाबत थोडे गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले दिसते. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी जनतेला आश्वासन दिले होते की, कोरोनावर ‘लस’ येताच ती देशातील सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. पंतप्रधानांनी लसीचे वितरण करताना कोठेच जात, धर्म, प्रांत, राजकारण मध्ये आणले नाही, पण आता बिहार विधानसभेच्या प्रचारात भाजप नेत्यांनी विचित्र भूमिका घेतली आहे. कोरोनावरील लसीचे उत्पादन सुरू झाल्यावर बिहारमधील जनतेला ती लस मोफत उपलब्ध केली जाईल असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तर सांगितले आहेच, पण भाजपच्या जाहीरनाम्यातही तसे वचन पहिल्या क्रमांकावर दिले आहे. बिहार विधानसभा निवडणूक ही कोरोना संसर्गाच्या काळात होणारी पहिलीच मोठी निवडणूक आहे.

व्हर्च्युअल सभा होतील व इतर नेहमीचे उद्योग होणार नाहीत असे वातावरण निर्माण झाले होते, पण बिहारात मैदानात जाहीर सभा सर्व सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून होत आहेत. नेत्यांची हेलिकॉप्टर्स उडत आहेत व प्रचंड गर्दीचे कार्यक्रम सुरू आहेत. त्या गर्दीत बहुधा ‘कोरोना’ चिरडून मरणार व राजकीय क्रांती होणार असेच चित्र बिहारात आहे. लोकांना कोरोनाची भीती राहिलेली नाही. त्यांना बिहारात सत्ताबदल करायचा आहे. बिहारमध्ये जे काय निकाल लागायचे ते लागतील, पण भाजपने लोकांच्या मनात कोरोनाची भीती वाढवून मोफत लसीच्या सुया टोचण्याचे ‘फुकट’ उद्योग सुरू केले आहेत. म्हणजे ”तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला कोरोनाची लस फुकट टोचू” असा हा सौदा आहे. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here