म्हणून झाला खडसेंच्या पक्षप्रवेशाला उशीर; चंद्रकांत पाटलांनी सांगितले कारण

मुंबई :

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकला असून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहेत. एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्यानंतर अनेक समीकरण बदलताना पाहायला मिळत आहेत. खडसे यांच्या पक्षप्रवेशाला उशीर झाला होता. दरम्यान जितेंद्र आव्हाडही शरद पवारांच्या बंगल्यावर भेटीस गेले होते. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्या पक्षप्रवेशाला उशीर का झाला याचे कारण सांगितले आहे.

पाटील म्हणाले की, खडसेंच्या पक्षप्रवेशाला २ तास उशीर का झाला? कारण खडसेंना नेमकं काय द्यायचं ते राष्ट्रवादीनं ठरवलंच नव्हतं. आता जे मिळेल त्यानं खडसेंचं समाधान होणार आहे का?, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

समाधान लिमलेटच्या गोळीनं होतं आणि कॅडबरीनंसुद्धा होतं. यातलं खडसेंना काय मिळतं, ते पाहावं लागेल, असेही पुढे बोलताना ते म्हणाले. दरम्यान आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसेंसोबत त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनीही भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here