म्हणून पुढची २० वर्ष भासणार कोरोना लसीची गरज; आदर पुनावालांचे स्पष्टीकरण

मुंबई :

कोरोनाची लस कधी येणार, याकडे सर्व जगाचे डोळे लागलेले आहेत. दरम्यान युरोपीय देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. अवघ्या ७ दिवसांमध्ये ९ लाख लोक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित झालेले आहेत. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जगातील सगळ्यात मोठी लस निर्माण करणारी कंपनी सीरम इन्स्टीट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी ‘जगभरात पुढच्या २० वर्षापर्यंत कोरोनाचा धोका कायम राहणार असून तोपर्यंत कोरोनाची लसीची गरज भासू शकते’, असा अंदाज व्यक्त केला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, एकदा वापर झाल्यानंतर लसीची गरज संपली असं आतापर्यंतच्या इतिहासात दिसून आलेले नाही. फ्लू, निमोनिया, पोलियो, कांजण्या या आजारांवरच्या लसी अनेक वर्षांपासून दिल्या जात आहेत. यातील कोणत्याही आजाराचे लसीकरण बंद करण्यात आलेले नाही. लोकसंख्येतील १०० टक्के लोकांचे जरी लसीकरण करून झाल्यानंतरही कोरोनाच्या लसीची गरज संपणार नाही.

आजवर अनेकांचा गैरसमज असा होता की लस आली की कोरोना नियंत्रणात येईल मात्र तज्ञांनीसुद्धा कोरोना व्हायरसची माहामारी इतक्यात नष्ट होणार नाही, असे स्पष्ट केलेलं आहे.  

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here