महाविकास आघाडी सरकारचे आभार मानत रोहित पवारांनी केंद्राकडे केली ‘ही’ मागणी

मुंबई :

राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीचे चित्र निर्माण झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. यानंतर राष्ट्रवादीचे युवा नेते व कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभार मानत केंद्र सरकारने एक मागणी केली आहे.

रोहित पवार यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे मनापासून आभार. आता केंद्र सरकारनेही आपली जबाबदारी पार पाडावी, त्यासाठी जीएसटीचे राज्याच्या हक्काचे २८ हजार कोटी रुपये व एनडीआरएफ अंतर्गत देण्यात येणारी मदतही तातडीने द्यावी, ही विनंती.

पूर आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तातडीनं मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षांकडून आणि शेतकरी संघटनांकडून सातत्याने होत होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदतीबाबत आढावा बैठक पार पडली.

या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करत सांगितले की, ही मदत नुकसानग्रस्तांना तातडीनं वितरित करण्यात येणार आहे. पुढे बोलताना त्यांनी राज्याचे केंद्राकडे ३८ हजार कोटी थकीत असून केंद्रानं अजूनही ही रक्कम दिली नसल्याचं सांगितलं आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here