संतप्त शिवसेनेनं सुनावले; ‘याकडेही’ डोळेझाक करणार हा प्रश्नच आहे!

मुंबई :

वायुप्रदूषणाच्या दुष्परिणामांचा अभ्यास करणाऱ्या अमेरिकेतील एका संस्थेने दिलेल्या अहवालानुसार 2019 या एकाच वर्षात भारतात 1 लाख 16 हजार नवजात बालकांचा वायुप्रदूषणामुळे मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखात महत्वाचे भाष्य करत काही सवाल केले आहेत.

वाचा, नेमकं काय म्हटलं आहे सामनामध्ये :-   

ग्लोबल एअरच्या अहवालानुसार वायुप्रदूषणामुळे जी बालके मृत्युमुखी पडली ती गर्भावस्थेत असतानाच प्रदूषणाची शिकार झालेली होती. स्वयंपाक आणि इतर कामांसाठी लाकूडफाटा जाळून, कोळसा किंवा गोवऱ्यांचा चुलींमध्ये जळण म्हणून वापर करणाऱ्या कुटुंबांमध्ये या

बालमृत्यूचे प्रमाण

सर्वाधिक आहे. चुलीजवळ काम करणाऱया गर्भवती महिलांद्वारे हे प्रदूषण गर्भातील बाळापर्यंत पोहचते. त्यामुळे एक तर मुदतपूर्व प्रसूती किंवा प्रसूतीनंतर जन्मलेल्या बाळाचे वजन कमी असणे आणि त्यातून गंभीर आजार उद्भवून बालके मृत्युमुखी पडणे असे हे दुष्टचप्र आहे. वातावरणातील हवेची गुणवत्ता योग्य पद्वतीने राखता आली तर ही ‘कोवळी पानगळ’ रोखणे सहजशक्य आहे. मात्र हे करायचे कोणी? कारखानदारीमुळे फैलावणारे वायुप्रदूषण हा आपल्या देशात मोठा विषय आहे. शिवाय शेतीचा हंगाम संपल्यानंतर पिके काढून उरलेले अवशेष जाळून टाकण्यामुळे दरवर्षी राजधानी दिल्ली धुक्याबरोबरच प्रदूषणाच्या धुरामध्ये हरवून जाते. प्रदूषण नियंत्रणाचे कठोर कायदे कानून चिक्कार आहेत, पण कागदांवरील नियमांचे पालन खरेच होते काय? नवजात बालकेच नव्हे, तर वृद्धांच्या आरोग्यावरही प्रदूषणाचे दुष्परिणाम होतातच. वायुप्रदूषणाच्या जीवघेण्या दुष्परिणामांविषयी अमेरिकन संस्थेने जाहीर केलेला ताजा अहवाल डोळ्य़ांत झणझणीत अंजन टाकणारा आहे. हिंदुस्थानसारख्या देशात केवळ वायुप्रदूषणामुळे दरवर्षी लाखावर बालके मृत्युमुखी पडत असतील तर हे चित्र शरमेने मान झुकावी असेच आहे. हा अहवाल तरी आपण डोळय़ांत तेल घालून वाचणार, की प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांप्रमाणेच याकडेही डोळेझाक करणार हा प्रश्नच आहे!

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here