शिवसेनेचा हल्लाबोल; ‘ते’ तरी आपण कुठल्या तोंडाने म्हणायचे?

मुंबई :

वायुप्रदूषणाच्या दुष्परिणामांचा अभ्यास करणाऱ्या अमेरिकेतील एका संस्थेने दिलेल्या अहवालानुसार 2019 या एकाच वर्षात भारतात 1 लाख 16 हजार नवजात बालकांचा वायुप्रदूषणामुळे मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखात महत्वाचे भाष्य करत काही सवाल केले आहेत.

वाचा, नेमकं काय म्हटलं आहे सामनामध्ये :-   

एक भयंकर अहवाल अमेरिकेतील संस्थेने जाहीर केला आहे. वायुप्रदूषणाच्या दुष्परिणामांचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार 2019 या एकाच वर्षात हिंदुस्थानात 1 लाख 16 हजार नवजात बालकांचा वायुप्रदूषणामुळे मृत्यू झाला. जन्म झाल्यानंतर महिनाभराच्या आतच ही बालके मृत्युमुखी पडली.

इकडे आपण

डिजिटल क्रांती, स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत मिशन वगैरे वगैरे गमजा मारतो, देश कसा वैभवशाली बनतो आहे हे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतोय आणि दुसरीकडे एकाच वर्षात लाखांहून अधिक तान्ही बाळे वायुप्रदूषणाच्या दुष्परिणामांमुळे मरण पावतात हे चित्र विदारक आहे. हे जग डोळे भरून पाहण्यापूर्वीच त्यांचा श्वास गुदमरत असेल तर त्याची जबाबदारी कोणाची? अमेरिकेतील ‘हेल्थ इफेक्टस् इन्स्टिटय़ूट अॅण्ड ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज’ या संस्थेने जगभरातील वायुप्रदूषणाच्या दुष्परिणामांचा सखोल अभ्यास करून ‘ग्लोबल एअर- 2020’ या शीर्षकाखाली जो अहवाल जाहीर केला तो भयंकर आहे. आश्चर्य असे की नायजेरिया, पाकिस्तान, इथिओपिया आणि कांगो या देशांपेक्षाही हिंदुस्थानात वायुप्रदूषणामुळे नवजात बालकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. वर्षाकाठी सवा लाखाच्या आसपास नवजात अर्भके जन्म घेऊन लगेचच देवाघरी जात असतील तर ‘मेरा देश बदल रहा है’ हे घोषवाक्य तरी आपण कुठल्या तोंडाने म्हणायचे?

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here