शिवसेनेचा रोकडा सवाल; ‘त्यांचा’ श्वास गुदमरत असेल तर त्याची जबाबदारी कोणाची?

मुंबई :

वायुप्रदूषणाच्या दुष्परिणामांचा अभ्यास करणाऱ्या अमेरिकेतील एका संस्थेने दिलेल्या अहवालानुसार 2019 या एकाच वर्षात भारतात 1 लाख 16 हजार नवजात बालकांचा वायुप्रदूषणामुळे मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखात महत्वाचे भाष्य करत काही सवाल केले आहेत.

वाचा, नेमकं काय म्हटलं आहे सामनामध्ये :-   

आपला देश किती वेगाने प्रगती करतो आहे, सर्वच क्षेत्रांमध्ये देशाची कशी घोडदौड सुरू आहे, हिंदुस्थान लवकरच कशी जागतिक महासत्ता वगैरे बनणार आहे अशी टिमकी वाजवणाऱ्या लंब्याचवड्या पोस्टस् आणि मेसेजेस्चा हल्ली सोशल मीडियावर धुमापूळ सुरू असतो. साठ-सत्तर वर्षांमध्ये देशामध्ये काहीच कसे झाले नाही इथपासून ते गेल्या पाच-सहा वर्षांतच देश कसा सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून उदयास आला इथपर्यंतचे दिव्य ज्ञान सोशल मीडिया नामक विद्यापीठाचे स्वयंघोषित प्रकांडपंडित इकडून तिकडे पाठवत असतात. देशात पुन्हा एकदा कसा सोन्याचा धूर निघणार आहे आणि गोरगरिबांच्या घरांवर सोन्याची काैले बसणार आहेत अशी फेकम्फाक करायलाही ‘फॉरवर्डी’ पंथाचे हे अनुयायी मागेपुढे पाहत नाहीत. मात्र सत्तापक्षाच्या आयटी सेलकडून होलसेलात पुरवल्या जाणाऱ्या अशा मेसेजेस्चा नित्यनेमाने रतीब घालणाऱ्या मंडळींचे डोळे खाडकन् उघडावेत असा एक भयंकर अहवाल अमेरिकेतील संस्थेने जाहीर केला आहे. वायुप्रदूषणाच्या दुष्परिणामांचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार 2019 या एकाच वर्षात हिंदुस्थानात 1 लाख 16 हजार नवजात बालकांचा वायुप्रदूषणामुळे मृत्यू झाला. जन्म झाल्यानंतर महिनाभराच्या आतच ही बालके मृत्युमुखी पडली.

इकडे आपण

डिजिटल क्रांती, स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत मिशन वगैरे वगैरे गमजा मारतो, देश कसा वैभवशाली बनतो आहे हे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतोय आणि दुसरीकडे एकाच वर्षात लाखांहून अधिक तान्ही बाळे वायुप्रदूषणाच्या दुष्परिणामांमुळे मरण पावतात हे चित्र विदारक आहे. हे जग डोळे भरून पाहण्यापूर्वीच त्यांचा श्वास गुदमरत असेल तर त्याची जबाबदारी कोणाची? 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here