उपमुख्यमंत्री अजित पवार होम क्वारंटाईन; वाचा काय आहे विषय

पुणे :

कोरोनाच्या काळात मास्क न लावल्यामुळे अनेक नेत्यांना खडसावणारे, वृत्तवाहिन्यांच्या बुम माईकवर सॅनीटायझरने फवारा मारणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे होम क्वारंटाईन आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ते महाराष्ट्राच्या विविध भागात फिरत होते. कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात सर्वात जास्त काळजी घेतानाचे अजितदादांचे फोटो आणि व्हिडीओ वेळोवेळी व्हायरल होत होते. अशातच अजित पवार हे राष्ट्रवादीच्या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना थकवा जाणवत असल्यानं ते होम क्वारंटाईन आहेत, अशी माहिती दैनिक लोकमतने दिली आहे.

महाविकास आघाडी सरकारचे आजवर अनेक मंत्री कोरोनामुक्त झालेले आहेत. लोकप्रतिनिधी म्हटल्यावर फिरावे तर लागतेच. त्यामुळे कोरोनाच्या विळख्यात अनेक मंत्री सापडले मात्र त्यांनी सगळ्यांनी कोरोनावर मात केली. बोलायला स्पष्ट, कामाशी तडजोड न करणारा आणि कामाचा मोठा उरक असणारा, उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी असणारा अजित पवारांसारखा नेता महाराष्ट्र संकटात सापडला असताना शांत बसने शक्य नव्हते. गेल्या काही महिन्यात अत्यंत काळजी घेत अजित दादांनी अवघ्या महाराष्ट्राचे दौरे केले आहेत. या काळात विश्रांतीही कमीच भेटली असावी त्यामुळेही कदाचित थकवा जाणवू शकतो. परंतु आपल्यासह सर्वांची काळजी घेणाऱ्या अजितदादांनी स्वतःला होम क्वारंटाईन केले आहे. असे असले तरी त्यांचे काम मात्र चालूच ठेवले आहे.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here