भाजपला मोठा धक्का : शिवसेना, अकालीदल पाठोपाठ भाजपने गमावला आणखी एक मित्रपक्ष

कोलकाता :

सुरुवातीला महाराष्ट्रातून शिवसेना, पंजाबमधून अकाली दल, काही दिवसांपूर्वी बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पासवान यांचा लोजप NDAच्या बाहेर पडला. आता अशातच अजून एका पक्षाने भाजपला धक्का दिला आहे. पश्‍चिम बंगालमधील दार्जिलिंग क्षेत्रात प्रभाव असणाऱ्या गोरखा जनमुक्ती मोर्चाने (जीजेएम) बुधवारी NDAच्या बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे भाजपने आणखी एक मित्रपक्ष गमावला आहे. 

भाजपला हा एक अनपेक्षित धक्का होता. ‘आम्ही 2009 पासून एनडीएचा घटक होतो. तसे असूनही भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दार्जिलिंग क्षेत्रासाठी कायमस्वरूपी राजकीय तोडगा काढण्याच्या आश्‍वासनाचे पालन केले नाही’, असे म्हणत जीजेएमचे प्रमुख बिमल गुरूंग यांनी NDAच्या बाहेर पडत असल्याची घोषणा केली.

दरम्यान, जीजेएम यापुढे बंगालमधील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसला साथ देणार आहे. पुढच्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. जीजेएमने घेतलेला हा निर्णय तृणमूलसाठी राजकीय फायद्याचा ठरू शकतो.

बिमल गुरूंग यांनी पुढे बोलताना केंद्र सरकारवर टीका केली. तसेच ‘गरखा समुदायाला अनुसूचित जमातींच्या यादीत अद्याप स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची भावना आपल्या मनात असल्याचेही स्पष्ट केले. दरम्यान भाजपला एवढे धक्के का मिळत आहेत, याचा आता विचार करण्याची गरज आहे, असे म्हटले जात आहे. एकूणच देशाच्या राजकारणात भाजपचे चाणक्य अमित शहा गायब होणं आणि भाजपला एकापाठोपाठ एक असे धक्के मिळणं, हा योगायोग नाही.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here