पंतप्रधान मोदींचे एकाच वेळी कौतुक आणि टोले; वाचा, ठाकरे शैलीच्या शालजोडीतील टोले

मुंबई :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशाला संबोधित केले. यावेळी मोदी नेमकं कशावर बोलणार, याची चर्चा सगळीकडे सुरु होती. या अनुषंगाने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात भाष्य करत मोदींचे कौतुक केलेय तर राज्यपालांना टोलाही लगावला आहे.

वाचा, नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-    

बाजारात हळूहळू उलाढाल वाढत आहे. आर्थिक उलाढालीत तेजी येत असल्याची माहिती मोदींनी दिली. ही गती जास्त कशी वाढेल? कोरोनामुळे जो

बेरोजगारीचा भस्मासुर

उसळला आहे त्यास कसा अटकाव करणार? यावर पंतप्रधान भूमिका मांडतील, असे वाटले होते. पण मोदींनी चकवा दिला. पंतप्रधानांनी संध्याकाळी सहाच्या भाषणात चिनी सैनिकांच्या घुसखोरीवर बोलावे, आमच्या हद्दीत घुसलेल्या चिनी सैनिकांना उचलून कधी बाहेर फेकणार ते सांगावे, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले होते. पण त्यापैकी एकाही विषयाला मोदी यांनी स्पर्श केला नाही. मोदी राजकीय व प्रशासकीय असे काहीच बोलले नाहीत. त्यांनी आध्यात्मिक मार्गाने राष्ट्राचे प्रबोधन केले. देशात रिकव्हरी रेट वाढतो आहे. मृत्यूदर कमी झाला आहे. दुनियेतील साधनसंपन्न देशांच्या तुलनेत आपण जास्तीत जास्त नागरिकांचे प्राण वाचविण्यात यशस्वी झाल्याचे मोदी यांनी सांगितले. आमच्या देशात प्रतिलाख साडेपाच हजार लोक कोरोनाग्रस्त आहेत. अमेरिकेत हे प्रमाण 25 हजारांवर आहे. हे खरे असले तरी अमेरिकेत कोरोना कारणाने जे लोक बेकार झाले आहेत, त्यांच्या बँक खात्यांवर ट्रम्प सरकार जगण्यासाठी भत्ता जमा करीत आहे, हेसुद्धा तितकेच खरे. कोरोनावरील लसीचे संशोधन सुरू आहे. सर्व नागरिकांपर्यंत लस पोहोचविण्यासाठी सरकार शर्थ करेल, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी नवरात्र, दसरा, ईद, दीपावली, छटपूजा व गुरूनानक पर्व आदी सर्वधर्मीय सणांसाठी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. याचा स्पष्ट संदेश असाच आहे की, आपले पंतप्रधान घटनेनुसार ‘सेक्युलर’च आहेत आणि याची नोंद आपल्या राज्यपालांनी घेणे गरजेचे आहे. पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात देशवासीयांना काय दिले? त्यांच्या भाषणात नवीन काय? त्यांनी महाराष्ट्राच्या पूरग्रस्तांना काय दिलासा दिला? कोणते आर्थिक पॅकेज जाहीर केले? असा टीकेचा सूर निघू शकेल. तरीही मोदींचे भाषण छोटेखानी, पण प्रभावी होते. त्यात ‘डिसलाइक’ करण्यासारखे काहीच नव्हते. देशांतर्गत खऱया संकटाची त्यांनी जाणीव करून दिली. त्यांनी कोरोनासंदर्भात सत्य तेच सांगितले. हीच त्यांच्या अध्यात्माची ताकद. ते आले, ते बोलले. शुभ्र दाढी, तेजस्वी चेहरा. या तेजानेच देशातील संकटांचा अंधार दूर होईल. भारतीय जनता पक्षाची हीच भावना असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा!

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here