काँट्रॅक्ट फार्मिंगसाठीचे नियम झाले जारी; पहा कायद्यामध्ये कोणाच्या हिताचे होणार रक्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आणलेल्या कृषी सुधारणा विधेयकात नेमके काय आहे आणि कशासाठी त्याचे समर्थन किंवा विरोध करायचा हेच बहुसंख्य शेतकऱ्यांना माहित नाही. अनेक शेतकऱ्यांना हे धोरण कॉर्पोरेटधार्जिणे वाटत आहे. तर, भाजपने हे शेतकरी हिताचे असल्याचे म्हटले आहे.

अशावेळी आता केंद्र सरकारने फार्मर्स एग्रीमेंट ऑन प्राइस अश्योरेंस एंड फार्म सर्विसेज एक्ट, 2020 याद्वारे काँट्रॅक्ट फार्मिंगसाठीचे नियम कोणते असतील ते जाहीर केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलेले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, अशा पद्धतीने एकाच्या हिताला प्राधान्य देऊन दुसऱ्यांवर अन्याय करणारे कायदे कोणतेही सरकार करू शकत नाही. मग आपणच समजून घेऊया की त्याद्वारे शेतकऱ्यांचा नेमका कोणता लाभ होणार आहे.

या कायद्याद्वारे काँट्रॅक्ट फार्मिंगसाठीचे नियम तयार केले आहे. त्यानुसार शेतकरी आपल्याच भागातील महसूल अधिकाऱ्यांकडे याबाबत अर्ज दाखल करू शकणार आहे. तालुक्याच्या प्रमुख असलेल्या महसूल अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यावर ३० दिवसांमध्ये दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून निकाल देण्याचे बंधन घालण्यात आलेले आहे. तसेच दोन तालुक्यात जमीन असताना दोन्ही ठिकाणी हेलपाटे न घालता ज्या तालुक्यात जास्त जमीन आहे त्याच तालुक्यातील अधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांना तक्रार करता येणार आहे.

तसेच यावर सुनावणी होऊन निर्णय आल्यास जिल्हाधिकारी किंवा त्यांनी निर्देशित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे ३० दिवसात दाद मागता येणार आहे. त्यांनाही पुढील महिनाभरात त्यावर सुनावणी करून निकाल देण्याची अट यामध्ये असणार आहे. यामध्ये कंपन्यांचे हित नाही, तर शेतकरी हिताला प्राधान्य दिल्याचा दावा अजूनही केंद्र सरकार करीत आहे.

मात्र, शेतकऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या असलेली कमी काहिती आणि कंपन्यांचे प्रबळ प्रशासन यांच्यातून शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार हे यातून अजूनही स्पष्ट झालेले नाही. कारण, शेतकऱ्यांना यासाठी वकिलांवर खर्च करावा लागणार आहे. त्यातही वकील किंवा अधिकारी मॅनेज होण्याची भीती आहे. आतापर्यंत महसूल विभागाची शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी अन्याय करण्याची वृत्ती वेळोवेळी स्पष्ट झालेली आहे. अपवाद म्हणून शेतकरी हिताला त्यांच्याकडे प्राधान्य आहे. आताही तीच यंत्रणा मग कशी शेतकऱ्यांना न्याय देणार याचे कोडे काही उलगडेनासे झाले आहे.

संपादन  : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here