BLOG : चिराग नावाचा हनुमान नेमकी कोणाची लंका जाळणार; बिहारमध्ये मोदींच्या नावावर लोजपा मागतेय मतदान..!

‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सेवक आहे, अगदी हनुमानाप्रमाणे. माझी छाती फाडून पाहिलं तरी त्यांची छबी दिसेल’, असे लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी आघाडीची वृत्त वाहिनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

चिराग पासवान यांना निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदींचे फोटो वापरण्यापासून भाजपच्या नेत्यांनी अटकाव घातला. मात्र ते म्हणतात की, मोदी हे आमच्या मनात आहेत. आमच्या मनातून त्यांना कोणीही हटवू शकत नाही. भाजप नेत्यांनी ‘याबाबत’ केलेल्या विधानांनी त्यांचे मन दुखवलं असले तरी त्यांचे बोलविते धनी नितीशकुमार आहेत, हेही त्यांना चांगलेच ठाऊक आहे. नितीशकुमारांनी निवडणुकीचा धसका घेतला आहे. मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याची आवश्यकता त्यांना सर्वाधिक आहे. कारण त्यांना ही निवडणूक सोपी नाही. 

रामविलास पासवान यांचा मृतदेह पटना येथील विमानतळावर आणला असता, नितीशकुमारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मी त्यांना नमस्कारही केला पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. ना ते एक शब्द बोलले, प्रोटोकॉलप्रमाणे त्यांनी श्रद्धांजलीपर संदेश दिला. याउलट पंतप्रधान मोदींनी ही दुखद घटना घडल्यानंतर लगेच रात्री उशिरा फोन केला. वेळ काढून त्यांनी माझी भेट घेतली. आमच्या कुटुंबाचे सांत्वन केले. अगदी माझ्या खांद्यावर हात ठेवत त्यांनी मला समजावले. त्यांचे ते शब्द अगदी जसेच्या तसे माझ्या कानात गुंजत आहेत. नितीशकुमार यांच्याकडूनही अशाच कृतीची अपेक्षा होती. कारण, ते पप्पांचे चांगले मित्र होते. मात्र, राजकीय आकसापोटी त्यांनी कर्तव्य बजावण्यात कसूर केला. असो, अशा शब्दांत चिराग पासवान यांनी नितीशकुमार यांच्याबद्दलची नाराजी उघडपणे व्यक्त केली.

चिराग पासवान यांनी यापूर्वीच्या एका मुलाखतीतही असाच आरोप केला होता. त्यावेळीही ते म्हणाले की, मुख्यमंत्री फोन केला तरी घेत नाहीत, ते आम्हाला टाळतात. त्यांनी आतापर्यंत फक्त एकदा माझ्याशी बातचीत केली आहे. सुशांत सिंगच्या मृत्युप्रकरणी चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीशकुमारांना पत्र लिहले होते. तत्पूर्वी कोटा येथून विद्यार्थ्यांना बिहारला आणणे, व मजुरांना घरापर्यंत पोहचविण्याच्या मुद्द्यांवरून त्यांनी नितीशकुमारांच्यावर टीकेची तोफ डागली होती. पासवान यांनी ‘एनडीए मधील घटक पक्षांतील मतभेदांमुळे आमने-सामने येण्याची ही पहिलीच घटना नाही’, असेही स्पष्ट केले.

नितीशकुमार यांचा जेडीयू गुजरात आणि झारखंड निवडणुकीत भाजपविरोधात लढला आहे. इतकेच नव्हे तर आघाडी असतानाही नितीशकुमारांनी जुमई, हाजीपुर, वैशाली या लोकसभा मतदारसंघात आमच्याविरोधात काम करण्याच्या सूचना दिल्या. लोक जनशक्ती पक्षाला हरवा, असं फर्मानच त्यांनी काढलं होतं. म्हणूनच भाजपची सहमती असो वा नसो विधानसभा निवडणूक जेडीयूच्या विरोधात लढण्याचा चिराग पासवान यांनी निर्णय घेतला आहे. एनडीएतील बिघाडीला अशी ही सगळी पार्श्वभूमी आहे.

चिराग पासवान यांनी जे उमेदवार दिलेत त्यात ब्राह्मण, भूमिहार आणि दलित नेते आहेत. २० टक्के महिला उमेदवार आहेत. भाजप आणि जेडियुतील आयात नेत्यांनाही उमेदवारी दिली आहे. जवळपास सर्वच उमेदवार चाळीशीच्या आतील आहेत. पासवान यांनी जाहीर म्हटले आहे की, ‘नितीशकुमार पुन्हा येणे नाही.’

निकालानंतर, पासवान यांना मोदी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देणार का, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.  रामविलास पासवान यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली जाणार का? आणि दिली तर भाजपसह जेडीयू समर्थन देणार काय? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उभे राहतात.

बिहारच्या निवडणुकीत रंगत भरणाऱ्या चिराग पासवानांनी स्वतःला हनुमान म्हंटल असले तरी ते लंका नेमकी कोणाची जाळणार? की स्वतःचीच शेपटी जाळून घेणार..!

लेखक : मनोरंजन भारती, सिनियर एडिटर, एनडीटीव्ही तथा राजकीय विश्लेषक

अनुवाद व संपादन  : महादेव पांडुरंग गवळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here