महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पुन्हा पावसाचा इशारा; वाचा कुठे आहे पावसाचे संकट

मुंबई :

राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीचे चित्र निर्माण झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले आहे. शिवारात पाणीच पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. अशातच महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या भागात पावसाच्या मध्यम ते हलक्या आणि काही भागात जोरदार सरी कोसळणार असल्याचं हवामान विभागाने सांगितले आहे.

पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्यामुळे 20, 21 आणि 22 तारखेला राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. ‘IMD GFS नुसार 21, 22 ऑक्टोबर दरम्यान राज्यात काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. विदर्भ,मराठवाडा,द.मध्य महाराष्ट्र, द.कोकणाच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता’, असा इशारा देत त्यांनी बळीराजानं पिकाची काळजी घेणे आवशक्य असल्याचं सांगत सर्वांनाच सतर्क केलं. 

आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रावर संकट आणखी वाढले आहे. अतिवृष्टीमुळे मराठवड्यातील शेतीचे सगळ्यात जास्त नुकसान मराठवाड्यातील ४ लाख ९९ हजार ६४८ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात राज्यातली ५७ हजार ३५४ हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली आहे. मुसळधार पाऊस आणि विविध नद्यांना आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका हा सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर या शहरांना बसला आहे.   

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here