म्हणून ढोल पिटण्याची नामुष्की आली नसती; शिवसेनेचा ‘त्यांना’ टोला

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आज बिहार निवडणूक आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या राजकीय, सामाजिक विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी भाजपवर खोचक टिकाही केली आहे.

नेमकं काय म्हटल आहे सामनाच्या अग्रलेखात :-

बिहारच्या निवडणुकीत नितीशकुमार हा खरोखरच विकासाचा चेहरा आहे काय? याचे उत्तर त्यांच्याच मंत्रिमंडळातील नगरविकास आणि गृहनिर्माणमंत्री सुरेश कुमार शर्मा यांनी दिले आहे. त्यांनी गडबड अशी केली आहे की, एक झगमगाट करणाऱ्या ‘स्ट्रीट लाइट’ने उजळून निघालेल्या फ्लायओव्हरचा फोटो स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आणि त्याला शीर्षक दिले, ‘मुझफ्फरपूर स्ट्रीट लाइट योजना.’ त्यापुढे जात हे महाशय सांगतात, मुझफ्फरपूरचे रस्ते कसे झगमगाट करत आहेत ते बघा. मुझफ्फरपूरमध्ये एकूण 17 हजार 554 झगमगते ‘स्ट्रीट लाइट’ आपल्या कार्यकाळात लावण्यात आले आहेत. काम केले आहे, काम करीत राहीन. मुझफ्फरपूरचा विकास असाच सुरू राहील, असे लिहून मंत्री महोदय मोकळे झाले. आता जागरुक

मतदारही कामास लागले

व हा भव्य सुंदर प्रकाशमान रस्ता शोधू लागले. तेव्हा संपूर्ण मुझफ्फरपूर पालथे घातले तरीही मंत्र्यांनी ‘टाकलेला’ या फोटोतील रस्ता मिळाला नाही. कारण नितीशकुमारांच्या मंत्र्यांनी ‘स्वतःचे कार्य’ म्हणून टाकलेला हा फोटो प्रत्यक्षात हैदराबादमधील रस्त्याचा होता. तर बिहारच्या विकासाचा खरा चेहरा हा असा आहे! सुशांतसिंह राजपूतच्या नावावर मते मागणे सुरूच आहे व आता हे इतर राज्यांतील विकास कामे स्वतःच्या नावावर खपविण्याचे भुरटे-भामटे उद्योगही नव्या दमाने सुरूच आहेत. बिहारमध्ये कुपोषण, भूक, रोजगाराचा प्रश्न आगडोंबासारखा उसळला आहे. आमचे बिहारी मजूर इतर राज्यांत जातात म्हणून त्या त्या राज्यांचा विकास होतो वगैरे बोलणे ठीक आहे हो, पण हे मजूर बिहार सोडून परराज्यांत जातात ते पोटाची आग विझवण्यासाठी. जे मजूर इतर राज्यांत जाऊन विकास शिल्प घडवतात त्याच श्रमणाऱया हातांच्या ताकदीवर नवा बिहार, विकासाच्या मार्गावरील बिहार का घडवता आला नाही? खरोखरच या श्रमिकांच्या हातांना त्यांच्याच राज्यात काम मिळाले असते तर हैदराबादच्या रस्त्यांचे झगमगणारे फोटो ‘आपलेच’ म्हणून ढोल पिटण्याची नामुष्की आली नसती. सत्तेवर राहूनही इतक्या वर्षांनंतर ही वेळ यावी हे बिहारच्या जनतेचे दुर्दैवच म्हणावे लागेल. नोकरीसाठी बिहारचे मजूर महाराष्ट्रात आणि प्रचारासाठी हैदराबादचे झगमगीत रस्ते बिहारात. याच रस्त्यांवर बहुधा ‘भाजप-जदयु’ची संयुक्त प्रचार सभा होईल असे दिसते. नितीशकुमार हे भाजपचे भरवशाचे जुने साथी असल्याने त्यांच्याविषयी जास्त न बोलणेच योग्य!

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here